पोलिस दारूबंदी करत नाहीत; म्हणून महिलांनीच केला हल्लाबोल!

मंगेश शेवाळकर
बुधवार, 15 मे 2019

पोलिसांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, दारुमुळे संसार उध्वस्त होत आहेत, आता दारु विक्री करू देणार नाही म्हणजे नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेत वगरवाडी (ता.औंढा नागनाथ) येथील महिलांनी बेकायदेशीर देशीदारु विक्री करणाऱ्या टपरीवर हल्लाबोल करून दारु जप्त केली. यापुढे 'दारु विक्री केल्यास खबरदार!' असा इशाराही दिला आहे. 

हिंगोली : पोलिसांना सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, दारुमुळे संसार उध्वस्त होत आहेत, आता दारु विक्री करू देणार नाही म्हणजे नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेत वगरवाडी (ता.औंढा नागनाथ) येथील महिलांनी बेकायदेशीर देशीदारु विक्री करणाऱ्या टपरीवर हल्लाबोल करून दारु जप्त केली. यापुढे 'दारु विक्री केल्यास खबरदार!' असा इशाराही दिला आहे. 

औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे एका चहाच्या टपरीवर बेकायदेशीररित्या देशीदारुची विक्री होत होती. सकाळपासून ते सायंकाळी उशीरापर्यंत याठिकाणी दारु विक्री केली जात होती. त्यामुळे भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत.

दिवसभर काम करणारे काही मजूर रात्री मात्र दारु पिऊन गोंधळ घालत असल्याचे चित्र होते. या प्रकाराला महिला देखील वैतागल्या होत्या. वगरवाडी येथे होणारी बेकायदेशीर देशीदारु विक्री तातडीने बंद करावी, अशी मागणी महिला मंडळाने हट्टा पोलिसांकडे केली होती.

मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे दारु विक्री करणाऱ्याला अभय मिळू लागले होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी (ता.१५) सकाळी सात वाजता एकत्र येऊन टपरी चालकाच्या टपरीवर हल्लाबोल केला. यावेळी टपरीमधे ठेवण्यात आलेल्या देशी दारुच्या बाटल्याही काढून ठेवल्या.

यावेळी निलाबाई कोळी, पारूबाई कच्छवे, कमलाबाई रावळे,  तुळसाबाई सोळंके, रेणुकाबाई कोळी, कलाबाई पवार, द्वारकाबाई कदम, अनुसया कदम, रेखा चोरघडे, उषा कदम पार्वती कोळी, मीरा बोबडे, कलावंती कदम, सखुबाई गिरी,  तुळसाबाई पवार, गिरजाबाई चोरघडे, जानकाबाई राठोड. सुनिता सोनुने, कमलाबाई पवार, कांताबाई देवरे आदी महिलांचा समावेश होता. या महिलांनी दारुच्या बाटल्या टपरी समोरच ठेऊन ठाण मांडले.

पर्यंत पोलिस येत नाही तोपर्यंत जागचे  हलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर जवळाबाजार पोलिस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दारु विक्री करणाऱ्यास ताब्यात घेतले असून दारुच्या बाटल्याही जप्त केल्या आहेत. महिलांच्या या धाडसाचे कौतूक केले  जात आहे.

Web Title: Women forcefully closed illegal liquor shop in Hingoli

टॅग्स