महिलांनी पुरूषांसाठी खुले केले ज्ञानमंदिर

सुशांत सांगवे
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

बहिणाबाई वाचक मंच; पंचवीस वर्षांपासून अविरतपणे सुरूय ज्ञानयज्ञ 

लातूर : गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या मंदिराची दारे महिलांसाठी खुली झाल्याचे आपण पाहिले अन्‌ ऐकले आहे; पण लातूरात असे एक ज्ञानमंदिर आहे, ज्याची दारे महिलांनी पुरूषांसाठी खुली केली आहेत. बहिणाबाई वाचक मंच, असे या ज्ञानमंदिराचे नाव असून यात महिलांबरोबरच आता पुरूषांनी सहभागी होता येणार आहे. वेगवेगळ्या लेखकांशी संवाद साधता येणार आहे. विविध विषयांवरील पुस्तकांवर चर्चा घडवून आणता येणार आहेत. समाजात वाचन चळवळ फुलवता येणार आहे. 

हल्ली वॉट्‌स ऍपच्या वापरावरून स्त्रीयांची खिल्ली उडवली जाते. बायका पुस्तकेच काय पण रोजचे दैनिकही वाचत नाहीत, अशी सरसकट टीका केली जाते. पण नोकरी-व्यवसाय, घरकाम, इतर सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून दर महिन्याला नियमितपणे एखाद्या पुस्तकावर वाचन करणे, त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन कार्यक्रमाच्या माध्यमातून करणे, संबंधीत पुस्तकाच्या लेखकाला बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे, असा अविरत उपक्रम लातूरातील काही महिला चालवत आहेत. तेही गेल्या 25 वर्षांपासून. आता या उपक्रमात पुरूषांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

भारतीय स्त्रीशक्ती शाखा द्वारा संचलित बहिणाबाई वाचक मंच डॉ. ज्योत्स्ना कुकडे आणि समविचारी कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने सुरू झाला. सुरवातीला हा वाचकमंच पुस्तक भिशी स्वरूपात चालायचा. दर महिन्याला विशिष्ट रक्कम गोळा करून ज्याची भिशी लागेल, त्यांनी त्यातून पुस्तकं विकत घ्यायची आणि त्या पुस्तकाचं मंचामध्ये वाचन होऊन गटचर्चा व्हायची.

आत्मचरित्रापासून ते प्रवासवर्णनापर्यंत विविध विषयातली विविध पुस्तकं मंचात वाचली गेली. आजवर लेखिका मीना प्रभू, नॉर्वेमधील भारतीय लेखीका सरिता स्कगनेस, गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, अनघा लवळेकर, स्नेहल पाठक, मृणालिनी चितळे अशा अनेक लेखिकांनी या मंचाला भेट देऊन महिलांशी संवाद साधला आहे. 

बहिणाबाई वाचक मंच समिती सदस्य वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण वर्षभराचं नियोजन करतात. विषयाची निवड करणे, संबंधित विषयाच्या पुस्तकांची सूची तयार करणे, ती सदस्यांपर्यंत पोहोचवणे, सादरीकरण करणाऱ्या सदस्यांना अभिवाचनासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करणे अशी कामे ही समिती करते. सादरीकरण करणारे सदस्य त्या पुस्तकाचे आधी वाचन करतात. त्यावर एक प्रबंध तयार करतात. त्याचे वाचन मंचात केले जाते. त्यानंतर खुली चर्चा होते. या चर्चेत सर्व उपस्थित सहभाग घेतात.

याशिवाय, काव्यवाचन, निबंध स्पर्धा, लेखकांच्या मुलाखती असेही कार्यक्रम घेतले जातात. त्यासाठी सतिश आणि सविता नरहरे या दाम्पत्याने सभागृह उपलब्ध करून दिले. समिती सदस्य म्हणून उमा व्यास, कल्पना भट्टड, अरुणा दिवेगावकर, डॉ. जयंती अंबेगावकर, डॉ. अंजली टेंभुर्णीकर, सुनिता कुलकर्णी-देशमुख, वर्षा कुलकर्णी या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला समर्थपणे काम पाहत आहेत. 
 

सोशल मीडियामुळे फक्त महिलांमध्येच नव्हे तर एकंदरीतच वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पण या वाचकमंचामुळे महिलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. ती वाढत आहे. एक स्त्री शिकली तर सारे कुटुंब शिकते. त्याप्रमाणे घराघरांतून वाचन चळवळ रुजवण्यासाठी बहिणाबाई वाचक मंचाचे खूप मोठे योगदान असेल. 
- डॉ. ज्योत्स्ना कुकडे, सामाजिक कार्यकर्त्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women in latur started readers forum