मध्य प्रदेशात महिलांची विक्री करणारा नराधम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

संशयिताकडे सापडलेल्या वहीत मध्य प्रदेश, गुजरात आदी ठिकाणच्या व्यक्तींची नावे व फोन क्रमांक आढळले असून, ते क्रमांक दलाल व मध्यस्थींचे असल्याचे त्याने सांगितले आहे.

औरंगाबाद : महिलांची मध्य प्रदेशात विक्री केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता. 10) वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे-तांबडे यांनी दिले. शिवाजी ऊर्फ गणेश भागाजी धनेधर असे त्याचे नाव आहे. 

हनुमाननगर येथील दोन महिलांची मध्य प्रदेशात विक्री केल्याचा प्रकार जुलै महिन्यात समोर आला होता. याप्रकरणी आठ जुलैला जवाहरनगर पोलिस ठाण्यात महिलांची तस्करी, फसवणूक व कट रचणे या कलमांन्वये शिवाजी ऊर्फ गणेश भागाजी धनेधर (44, रा. रमानगर, औरंगाबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 75 दिवसांनंतर त्याला एक डिसेंबरला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 

इथे होता सेक्ससाठी तीन हजारांचा रेट

पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता संशयिताने विक्री केलेल्या दोन महिलांपैकी एक महिला सापडली, तर दुसऱ्या महिलेला त्याने कुठे व कुणाला विकले, याची माहिती दिली असून, त्यानुसार मध्य प्रदेशात तपास सुरू असल्याचे सहायक सरकारी वकील एस. एल. दास-जोशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच संशयिताकडे सापडलेल्या वहीत मध्य प्रदेश, गुजरात आदी ठिकाणच्या व्यक्तींची नावे व फोन क्रमांक आढळले असून, ते क्रमांक दलाल व मध्यस्थींचे असल्याचे त्याने सांगितले आहे.

घाटीत या आजाराच्या रुग्णांचे अर्धशतक

त्यानुसार त्या व्यक्तींचा तपास करणे बाकी आहे. त्याचवेळी संशयिताच्या साथीदारांना अटक करणे, तसेच त्यांच्या ताब्यातून महिलांची सुटका करणे बाकी आहे. मानव तस्करी प्रकरणात आंतरराज्य टोळी असण्याची शक्‍यता असून, टोळीतील इतर आरोपींनाही अटक करावयाची आहे. त्यामुळे संशयिताला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women trafficking From Aurangabad in Madhya Pradesh