कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिला ताटकळल्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

आष्टी - कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या महिलांना रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे 23 तासांपेक्षा जास्त वेळ उपाशीपोटी ताटकळत बसण्याची वेळ आली. शस्त्रक्रियेसाठी नियोजित वेळेत डॉक्‍टर न आल्याने उपाशीपोटी राहिलेल्या अनेक महिलांना त्रास सहन करावा लागला. 

आष्टी - कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या महिलांना रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे 23 तासांपेक्षा जास्त वेळ उपाशीपोटी ताटकळत बसण्याची वेळ आली. शस्त्रक्रियेसाठी नियोजित वेळेत डॉक्‍टर न आल्याने उपाशीपोटी राहिलेल्या अनेक महिलांना त्रास सहन करावा लागला. 

शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत येथील रुग्णालयात दर गुरुवारी शस्त्रक्रिया शिबिर घेतले जाते. परंतु दोन आठवड्यांपासून शिबिर झाले नव्हते. त्यामुळे यावेळी शिबिराला बुधवारी दुपारीच सुमारे 30 महिला दाखल झाल्या होत्या. या महिलांना गुरुवारी सकाळी नऊ वाजता डॉक्‍टर येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या शस्त्रक्रियेपूर्वी महिलांना बारा तास अन्नसेवन वर्ज्य करण्यास सांगण्यात येते. त्यानुसार बुधवारी रात्री नऊ वाजता महिलांना आहार देऊन पोट साफ होण्याच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. 

दरम्यान, गुरुवारी सकाळी नऊ वाजता शस्त्रक्रियेसाठी डॉ. बंदखडके येणार होते. परंतु धामणगाव, कडा येथील शिबिरे उरकण्यास त्यांना उशीर झाला. दुपारी बारानंतर रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम ढळू लागला. यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल टेकाडे यांच्याकडे काही नातेवाइकांनी विचारपूस केली असता त्यांनी "थांबायचे असेल तर थांबा, नाहीतर बाहेर जा' असे उत्तर दिल्याने नातेवाईक संतप्त झाले. योग्य ती माहिती मिळत नसल्याने एकीकडे नातेवाईक अस्वस्थ झाले होते, तर रात्रीपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांनाही भोवळ येण्याची वेळ आली. त्यामुळे काहींनी महिलांना घरी परत नेण्याचा निर्णय घेतला. दाखल केलेल्या अनेक महिलांना कॉट नव्हते. त्यामुळे त्यांना चटईवर झोपावे लागले. पुरेशी जागा नसल्याने काही महिला बाहेर वाहनांत बसून होत्या. रात्रीपासून उपाशीपोटी राहिल्याने व त्यात कडक ऊन असल्याने महिलांना त्रास सहन करावा लागला. शेवटी रात्री आठ वाजता डॉ. बंदखडके दाखल झाले. त्यानंतर महिलांवर रात्री उशिरा शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या. यावेळी वीस महिला रुग्णालयात राहिल्या होत्या.

डॉक्‍टरांनी दाखल होऊन नंतर घरी गेलेल्या महिलांना "मेडिकली अनफिट' ठरविले. मात्र, येथील गलथान कारभारामुळेच महिलांनी घरी जाणे पसंत केले. यापूर्वीही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांकडून पैसे मागण्याचा प्रकार येथे घडला होता. डॉक्‍टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्याचे प्रकार नेहमीच होत आहेत. 

आष्टीच्या आधी तालुक्‍यातील धामणगाव व कडा येथेही डॉ. बंदखडके हे शस्त्रक्रियेसाठी गेले होते. धामणगावात 50, तर कड्यात 40 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्व शस्त्रक्रिया करण्यास एकच डॉक्‍टर असल्याने आष्टीला येण्यास त्यांना उशीर झाला. 
- डॉ. राहुल टेकाडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, आष्टी. 

अन्नपाण्यावाचून हाल 
बुधवारी रात्री आठपासून पोटात अन्नाचा कण नाही. आत दाखल करण्यास जागा नसल्याने आम्ही बाहेर रिक्षात बसून होतो. उन्हामुळे खूप त्रास झाला. लहान बाळालाही खूप त्रास झाला. 
- रोहिणी कसबे, रुग्ण, खडकत, ता. आष्टी.

Web Title: women waiting for Family planning surgery