"आयजी'च्या बंगल्यात कामगाराची आत्महत्या! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

औरंगाबाद - दोन वर्षांपासून औरंगाबादच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या बंगल्यात काम करणाऱ्या अंशकालीन सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी आल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चार दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी, काही दिवसांपासूनच विशेष महानिरीक्षक रजेवर गेले आहेत. 

औरंगाबाद - दोन वर्षांपासून औरंगाबादच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या बंगल्यात काम करणाऱ्या अंशकालीन सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी आल्यानंतर बुधवारी (ता. एक) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चार दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी, काही दिवसांपासूनच विशेष महानिरीक्षक रजेवर गेले आहेत. 

दयानंद उत्तम उमप (वय 30, रा. बीड), असे आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे. दोन वर्षांपासून ते विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या बंगल्यात सफाई कामगार म्हणून कामास होता. दोन मुले आणि पत्नीसह ते बंगल्यातील एका आऊट हाऊसमध्ये राहत होते. पोलिसांनी माहिती दिली, की विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील 23 फेब्रुवारीला रजेवर गेले होते. त्यामुळे बंगल्यात दयानंद यांच्या कुटुंबीयांशिवाय कोणीही नव्हते. दयानंद यांची पत्नीही शहरातीलच सिडकोत असलेल्या माहेरी गेली. त्यामुळे तेही खोलीला कुलूप लावून बीडला जातो म्हणून अन्य कामगारांना सांगून गेला होता. यानंतर मात्र, तो कधी आला, याची माहिती कोणालाच नव्हती. बुधवारी सकाळी बंगल्यातील खोलीत दुर्गंधी येत असल्याने अन्य एका कामगाराने दरवाजावर थाप मारली. पण आतून प्रतिसाद न आल्याने त्याने ही बाब महानिरीक्षक कार्यालयाला कळवली. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडला. त्यावेळी दयानंद उमप यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. 

मृतदेह घाटीत नेल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पण तेथे कोणतीही चिठ्ठी अथवा ठोस बाबी सापडल्या नाहीत. या घटनेप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली. दयानंद उमप यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पतीची वार्ता ऐकून पत्नी अत्यवस्थ 
दयानंद उमप यांनी आत्महत्या केल्याची बाब त्यांची पत्नी व बीडस्थित नातेवाइकांना कळविण्यात आली. घटनेनंतर पत्नी महानिरीक्षक बंगल्याकडे आली. पतीची झालेली अवस्था पाहून तिला चक्कर आली. यानंतर तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

जबाबदारांवर गुन्हा नोंदवा.. 
दयानंद उमप यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, त्यांच्यावर गुन्हा नोंदवा, अशी मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली, पण पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले. उमप यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यांनी ओढणीने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली, अशी माहिती घाटीतील डॉक्‍टरांनी दिली. 

Web Title: worker suicides