दोनशेत एक आढळतो आयबीडीचा रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

तीस वर्षांपूर्वी पाश्‍चिमात्य समजला जाणारा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज (आयबीडी) हा आजार आज दर दोनशे व्यक्तींमध्ये एकात आढळत आहे. आतड्यांना होणार हा आजार उमेदीच्या काळात रुग्णांना जडण्याचे प्रणाण अधिक असून साडेचार वर्षे ते ऐंशी वर्षांच्या रुग्णांचा यात समावेश आहे.

औरंगाबाद - तीस वर्षांपूर्वी पाश्‍चिमात्य समजला जाणारा इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज (आयबीडी) हा आजार आज दर दोनशे व्यक्तींमध्ये एकात आढळत आहे. आतड्यांना होणार हा आजार उमेदीच्या काळात रुग्णांना जडण्याचे प्रणाण अधिक असून साडेचार वर्षे ते ऐंशी वर्षांच्या रुग्णांचा यात समावेश आहे. योग्यपद्धतीने निदान करूनच उपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण करणे शक्‍य होईल, अशी माहिती पंचनसंस्था व यकृतविकारतज्ज्ञ डॉ. रमेश सातारकर यांनी दिली. 

जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात 19 मे हा आयबीडी दिन आहे. त्यालाच यकृत दिन म्हणून ओळखले जाते. या पार्श्‍वभूमीवर डॉ. सातारकर यांनी शनिवारी (ता.18) पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 

डॉ. सातारकर म्हणाले, ""आयबीडीचे क्रॉन्हस्‌ डिसीज व अल्सरेटिव्ह कोलायटिस असे दोन प्रकार आढळतात. तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या पचनयंत्रणेच्या कोणत्याही भागावर परिणाम होतो. आहार पद्धतीतील वेगाने होणारे बदल, ताणतणावाचे प्रमाण यामुळे आजाराला कारणीभूत ठरत आहे. हा आजार आतड्यांच्या बाह्य आवरणाला आलेल्या सुजेमुळे होतो. त्यामुळेच आतड्यांमध्ये अडथळ्यांसह अन्य त्रास आढळून येतात. क्रॉन्हस्‌ डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे काही प्रमाणात एकसारखे आहेत; परंतु ते पचनयंत्रणेच्या विविध भागांवर परिणाम करतात. क्रॉन्हस्‌ डिसीज तोंडापासून गुदद्वारापर्यंत पचनयंत्रणेच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो, तर अल्सरेटिव्ह कोलायटिस हा केवळ गुदमार्ग आणि कोलोन यांच्यावर परिणाम करतो,'' असे त्यांनी सांगितले. 

आयुष्यभर घ्यावे लागतात उपचार 
अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या रुग्णांमध्ये त्वचा, डोळे, हाडे आणि सांधे अशा इतर अवयवांवर परिणाम करणारी लक्षणे दिसू शकतात. अनेकदा आयबीडीमुळे आतड्यांतील अडथळे, शौचात बदल, कोलोन कर्करोग असे गंभीर आजार होऊ शकतात. आजाराचे निदान झाल्यावर आयुष्यभर उपचार घ्यावे लागते, असेही डॉ. सातारकर यांनी सांगितले. शौचाद्वारे येणारे रक्त प्रत्येक वेळी मुळव्याद नसतो. त्यामुळे त्याचे योग्य निदान गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World liver days IBD patient