World Photography Day : फोटोग्राफीतून मिळवली ओळख

हर्षदा हरसोळे 
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

१९ ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन. त्यानिमित्त शहरातील अवलिया फोटोग्राफर्संनी आपल्या कलेतून एक ओळख निर्माण केली. त्या कलेचा अन्‌ छायाचित्रांच्या प्रवासानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. 

औरंगाबाद -  विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी म्हणजे कला. विविध गोष्टींत कला आणि तिचे वैविध्य दिसून येते ते ती कला जोपासणाऱ्या कलाकारांमुळेच. १९ ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिन. त्यानिमित्त शहरातील अवलिया फोटोग्राफर्संनी आपल्या कलेतून एक ओळख निर्माण केली. त्या कलेचा अन्‌ छायाचित्रांच्या प्रवासानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. 

वाडल्डलाइफ सोबतच अंडरवॉटरही - बैजू पाटील
फोटो काढणे ही एक कला आहे. शब्दांमध्ये न लिहिता ते छायाचित्र दिसणे आणि माणसांनी स्टोरी बनवतो तो खरा छायाचित्रकार असे बैजू पाटील सांगतात. त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास करून या क्षेत्रात पाऊल टाकले. सुरवातीला वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे घेऊन फिरावे लागत होते; पण बदल्यात तंत्रज्ञानामुळे आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेसने फोटोग्राफी करणे अधिक सोपे झाल्याचे ते म्हणाले. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले आहे. आतापर्यंत १६५ ते १७९ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाटील यांच्याकडे आहेत. नुकत्याच ‘शूट ऑफ द फ्रेम’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाटील यांना जाहीर झाला आहे. अंडरवॉटर फोटोग्राफीसुद्धा पाटील करतात. अंडरवॉटर फोटोग्राफी ही मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी मानली जात असल्याने केवळ तीन टक्के लोक जगात ही फोटोग्राफी करतात. यात क्षणाक्षणाला रिस्क आहे; मात्र अंडरवॉटर फोटोग्राफी हे विश्वच वेगळं आहे. पॅडी नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. चार वर्षांपासून बैजू पाटील हे अंडरवॉटर फोटोग्राफी करीत असून, आतापर्यंत अंदमानमध्ये १५० डाईव्ह त्यांनी केले. येस बॅंकेचे पहिले ॲवॉर्डही बैजू पाटील यांनी मिळाल्याचे सांगितले. 

आवड इतरांना शिकवण्याची - श्रीकृष्ण पाटील
फोटोग्राफीचा छंद असल्यामुळे या कॅमेऱ्याची भाषा खूप चटकन समजली व सुचलीसुद्धा. कॅमेऱ्याला कशाचेच वावडे नसल्याने छायाचित्र म्हणजे आत्माविष्कार होत असल्याचे श्रीकृष्ण पाटील सांगतात. सुरवातीला आवड जोपासली ती छोटी-मोठी छायाचित्र काढून. हळूहळू याचे रूपांतर एका व्यवसायात झाले आणि याची प्रगती होत गेली. निव्वळ फोटोग्राफी नसून सिनेमॅटोग्राफीदेखील त्यांची स्पेशालिटी आहे. एक सिनेमॅटोग्राफर म्हणून माहितीपट, लघुपट, कमर्शियल जाहिराती, म्युझिक व्हिडिओ त्यांनी साकारल्या आहेत. सध्या वन्यजीवन, निसर्ग, ट्रॅव्हलिंगही आहे. त्यांनी आतापर्यंत १२ वन्यजीवन फोटो प्रदर्शने भरवलेली. राज्यातच नव्हे तर भारतभर ते विविध प्रदर्शनांत भाग घेतात. शिवाय इतरांना शिकवण्यातही त्यांना आवड आहे. झिनी झिनी, हॅंड इन हॅंड, एक और अध्याय, पारंपरिक कारागीर हे माहितीपट त्यांनी केले असल्याचे ते म्हणाले. 

छंदाला दिला सोशल टच  - ज्ञानेश्‍वर पाटील
निर्जीवते आड दडलेले वास्तव जगासमोर येते ते कॅमेऱ्यामुळेच. मग ते वास्तव एखादे नकोसे सत्य समोर आणते किंवा अमृत. अनाकलनीय कलात्मकता म्हणून जगासमोर मिरवते. म्हणूनच या छायाचित्रकारांची दुनियाच काही न्यारी असल्याचे ज्ञानेश्‍वर पाटील सांगतात. जनमानसाचे प्रत्येक भाव, निसर्गाचे अनोखे रूप प्रत्येक मनुष्यासही पाहायला शिकवतो तो छायाचित्रकार. हौशी छायाचित्रकार म्हणून ओळख असलेल्या ज्ञानेश्‍वर यांचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून भरीव काम समोर आले आहे. छंद होता; पण फोटोग्राफी कशी करतात हे माहीत नव्हते. वर्ष २०१५ मध्ये पहिला डीएसएलआर कॅमेरा घेतला, तेव्हा यू-ट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून छायाचित्रकारिता अवगत झाली. फोटोग्राफी हे क्षेत्र असे आहे, की इथे खूप साऱ्या लोकांच्या ओळखी होतात. लोक स्वतःहून संवाद साधतात. हा या क्षेत्राचा मोठा प्लसपॉइंट आहे. मागील वर्षी नुकत्याच चालू केलेल्या कलर्स ऑफ औरंगाबाद या इंस्टाग्राम पेजला येत्या नोव्हेंबर २०१९ मध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. छायाचित्राचे फिरते प्रदर्शनसुद्धा घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

वन्यजीवाने दिली ओळख - राजेंद्र डुमणे
आधुनिक कॅमेरे, लेन्सेसच्या मदतीने छायाचित्र खुलते, सजते; पण आधुनिक छायाचित्रणासोबत असलेली हस्तकला आजच्या छायाचित्रकारांकडून जोपासली गेली, वाढवली गेली तर आपल्या मातीतील छायाचित्र कलेचा दर्जा अजून उंचावेल. असे राजेंद्र डुमणे सांगतात. २० वर्षांपूर्वी शहरात आल्यावर येथील मित्रांच्या मदतीने वन्यजीव छायाचित्राचा प्रवास सुरू झाला. यात श्रीकृष्ण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सुरवातीला एक छंद म्हणून छायाचित्रकारिता केली व हा छंद जोपासत जोपासत गेल्या सहा ते सात वर्षांपासून व्यवसायासोबत छंद जोपासत आहे. वन्यजीव छायाचित्रांसाठी राजस्थानचे राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, कछ, दंडेली, भगवान राष्ट्रीय उद्यान इथे जाऊन कला आत्मसात केली. या छंदानेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नुकतेच २०१९ मध्ये फेडरेशन ऑफ इंडिया फोटोग्राफीचे सुवर्णपदक मिळाले. एएफआयपी ही पदवी त्यांनी मिळवली. राष्ट्रीय पदवी घेणारे मराठवाड्यातील पहिलेच छायाचित्रकार असल्याचा दावा ते करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Photography Day special story Identity gained from photography