बीड जिल्ह्यातील शेवग्याला कवडीमोल भाव, गुरांना टाकण्याची वेळ

बैलांसमोर शेवग्याच्या शेंगा टाकताना शेतकरी.
बैलांसमोर शेवग्याच्या शेंगा टाकताना शेतकरी.

अंबाजोगाई (जि. बीड) - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील अकोला येथील शेतकऱ्यांचा दोन एकर शेवगा लॉकडाऊनमुळे शेतात पडून आहे. जनावरांना टाकला तर तेही तोंड लावत नाहीत, तर बाजारातही मातीमोल भाव मिळू लागला आहे. या परिस्थितीत शेतकरी हतबल झाला आहे. 

तालुक्यातील अकोला येथील शेतकरी गुणवंत आगळे यांनी ऑॅगस्ट महिन्यात एक एकर शेवग्याची लागवड केली. त्यातच कांद्याचेही आंतरपीक घेतले. त्याला ठिबकव्दारे पाण्याचे नियोजन करून दोनवेळा सेंद्रिय फवारण्या व गावरान खतही दिले. यामुळे शेवग्याची वाढही उत्तम झाली; परंतु नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक वाहून गेले. शेवगा मात्र त्यातून वाचला. सातच महिन्यात शेवग्याला शेंगाही अपेक्षेप्रमाणे चांगल्या प्रतीत लगडल्या. घेतलेल्या पिकात चांगले यश आले असे वाटत असतानाच राज्यात सर्वत्र कोरोनाचा फैलाव सुरू झाला आणि कांद्याबरोबरच आता पुन्हा शेवग्यावरही संकट कोसळले. सगळीकडून नुकसानीचाच फेरा ओढावला. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

उसाच्या पिकामुळे तालुक्यातील हा भाग 'ग्रीन बेल्ट' म्हणून ओळखला जातो; परंतु २०१६ पासूनच्या सततच्या दुष्काळामुळे उसाचे पीक मोडीत काढून या भागातील शेतकरी सोयाबीन व इतर पिकाकडे वळला आहे. गुणवंत आगळे यांनीही वेगळा प्रयोग म्हणून ओडीसी वाणाचे हे शेवग्याचे पीक घेतले होते. एका एकरात सहाशे झाडांची त्यांनी ८ बाय १० अशा अंतरावर लागवड केली. कधी नव्हे ते पिकात फेरपालट केला; परंतु संचारबंदीमुळे शेवगा बाजारात नेता येईना. 

 संचारबंदीत शिथिलता असल्याने अंबाजोगाई शहरातील मंडईतील आडतीवर ९० किलो शेवगा घातला; परंतु त्याला प्रतिकिलो १० रुपये भाव लागला. त्यांचे ९०० रुपये झाले. आडत कर ८० रुपये, दुचाकीवर आणल्यामुळे १५० रुपयांचे पेट्रोल, तोडणी घरीच केल्यामुळे मजुरी लागली नाही; परंतु एकूण ३०० रुपये खर्च वजा जाता ६०० रुपये शिल्लक राहिले. काय करावे शेतकऱ्याने, शेवटी शेतकऱ्यांच्या पदरी काटेच का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

शेवग्याचे पीक चांगले आले. त्यामुळे किमान प्रतिक्विंटल ४० रुपये तरी भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र लॉकडाऊन व संचारबंदीमुळे शेवगा शेतातच पडून राहिला. घरच्या बैलांनाही चारा म्हणून टाकला; परंतु तेही याला खाईनात, संचारबंदीमुळे ही वेळ आली तरी यातून न खचता, हा शेवगा मोडणार नाही, यंदा नाही तर पुढच्या वर्षी भाव लागेल याचीच आशा असल्याच्या भावना गुणवंत आगळे यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com