येलदरी जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचा ५२ वर्षातील रेकॉर्डब्रेक, सोळा कोटींची वीज निर्मिती 

राजाभाऊ नगरकर
Tuesday, 13 October 2020

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे तीन महिन्यात १६ कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली. गेल्या ५२ वर्षाच्या इतिहासातील ओव्हरफ्लो वीजनिर्मितीचा हा पहिलाच रेकॉर्ड असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील येलदरी येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे तीन महिन्यात १६ कोटी रुपयांची वीजनिर्मिती केली. गेल्या ५२ वर्षाच्या इतिहासातील ओव्हरफ्लो वीजनिर्मितीचा हा पहिलाच रेकॉर्ड असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीचे हे जलविद्युत केंद्र तालुक्यातील जलसंजीवनी (सिंचनासाठी तालुक्याला फारसा उपयोग नसला तरी) असलेल्या पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी येथील धरणाशी संलग्न असून ते १९६८ मध्ये कार्यान्वित झाले. केंद्रातील तिन्ही संचाद्वारे वीज निर्मितीला सुरुवात झाली. 

हेही वाचा - परभणीत आशा स्वयंसेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

तीन महिन्यात ३०.८०० दशलक्ष युनिट एवढी वीजनिर्मिती 
धरणाच्या जलाशयाची साठवण क्षमता ९३४.४४ दशलक्ष घनमीटर असून ती पूर्ण होऊन धरण ओव्हरफ्लो झाल्यावर किंवा लाभ क्षेत्रासाठी नदीपात्रात विसर्ग सोडतेवेळी विद्युतनिर्मिती संच कार्यान्वित केले जातात. त्यामुळे वीजनिर्मितीची प्रक्रिया सातत्याने चालू नसते. परंतू, यावर्षी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि वरच्या भागातील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून सतत नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत असल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच येलदरी धरण तुडुंब भरल्याने जलविद्युत केंद्रातील तिन्ही संच कार्यान्वित करण्यात आले. ते सलग अद्यापपर्यंत सुरूच असल्याने तिन्ही संचाद्वारे बारा ऑक्टोबरपर्यंत ३०.८०० दशलक्ष युनिट एवढी वीजनिर्मिती झाली. ज्याचे बाजारमुल्य साधारतः सोळा कोटी एवढे आहे. हे जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासूनच्या ५२ वर्षातील रेकॉर्ड आहे. 

येथे क्लिक करा - गंगाखेडच्या दसरा महोत्सवाची सातशे वर्षाची परंपरा होणार खंडित

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे यश 
याचे श्रेय विद्युत केंद्रातील अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी कर्तव्यात नियमितता ठेवून कोरोनाच्या काळात दक्ष राहून केलेल्या अथक मेहनतीला देणे निश्चितच वावगे ठरेल. याबद्दल मुंबई मुख्य कार्यालयातील जल विभागाचे मुख्य अभियंता श्री. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता (नाशिक) श्री.कुमावत यांनी कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, एस.के. रामदास, एन.डी.महाजन, एस. बिलोलीकर, यू.खडके (सर्व उपकार्यकारी अभियंता), सहायक अभियंता एस.डी. गायकवाड, आर. तंत्रज्ञ एल.भंडारी, निलेश कानडे, अमोल शिवकर, कलकूटकी, माकोडे, वाकोडकर, हिंमत काळे, सातभाई, मुकाडे, एस.बोराळकर, भारती, कहाटे, मनोज बरहाटे आदींसह कंत्राटी कामगारांचे कौतुक केले.

हे देखील वाचाच - Video - नांदेडमध्ये उमेद प्रकल्पातील महिलांचा आक्रोश

आर्थिक वर्षात ४१.२४६ एमयुएस वीजनिर्मिती 
विशेष म्हणजे केंद्रातील संच व इतर यंत्र त्या काळापासूनचे जुने असून त्यांची वीजनिर्मिती क्षमता ४१.०४४ मिलियन युनिट (mus) असताना या आर्थिक वर्षात ४१.२४६ एमयुएस वीजनिर्मिती करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yeldari Hydropower Project Breaks Record In 52 Years Parbhani News