स्थानिक कारागिरांमध्ये मिसळा, नव्या कलाकृती घडवा

औरंगाबाद - जेएनईसीच्या आर्यभट्ट हॉलमध्ये यिन टॉक उपक्रमात उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी.
औरंगाबाद - जेएनईसीच्या आर्यभट्ट हॉलमध्ये यिन टॉक उपक्रमात उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी.

औरंगाबाद - इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कलाकारांचे वैविध्य जास्त आहे. त्यांच्यात मिसळून नव्या डिझाइन जगापुढे आणल्या, तर उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या जाऊ शकतील, असे मत प्रख्यात क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. कलाकाराच्या मर्यादा आणि क्षमतांबरोबरच ग्राहकांच्या गरजांचाही विचार केल्यास यशस्वी डिझायनर बनता येईल, असा मंत्र अंजली लोव्हेकर यांनी दिला. 

‘सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे ‘यिन फेस्ट’ची सुरवात झाली असून, यात शनिवारी डिझाइन क्षेत्राविषयी ‘यिन टॉक’द्वारे तरुणाईशी संवाद साधण्यात आला. संयुक्‍त प्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे आणि सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. आठ) जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्यभट्ट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला डिझायनिंग आणि आर्किटेक्‍चरच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे माजी विद्यार्थी आणि देशातील आघाडीचे प्रयोगशील क्राफ्ट डिझायनर आयुष कासलीवाल, मुंबईच्या इंटेरिअर डिझायनर अंजली लोव्हेकर यांनी ‘डिझाइन क्षेत्रातील संधी आणि त्यातील बदलते प्रवाह’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांच्या प्रश्नांनाही दोघांनी मनमोकळी उत्तरे देत शंकासमाधान केले. जेएनईसीचे प्राचार्य एच. एच. शिंदे, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, एमजीएम खादी सेंटरच्या संचालक शुभा महाजन, ‘यिन’चे महाराष्ट्र हेड तेजस गुजराथी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

‘कारागिरांच्या कलेचे रक्षण व्हावे’
भारतातील कारागिरांच्या कलांचे रक्षण करणे आवश्‍यक आहे, असे मत प्रसिद्ध फर्निचर डिझायनर आयुष कासलीवाल यांनी व्यक्त केले. जयपूर, झुंजनू, गीजगढ, सुलताना, रोहिडा या भागातल्या कलाकारांवर आणि त्यांच्या डिझाइनवर काही प्रयोग केले. त्यातून बनविलेल्या वस्तूंना जगाच्या बाजारपेठेत चांगली मागणी आली, हे सांगतानाच बाजारपेठेत योग्य विपणन झाल्यास आपल्याकडील कलागुणांना चांगले दिवस येतील, असेही ते म्हणाले. आपल्या जयपूर, आफ्रिका, इंदूर आणि एनआयडीतील अनुभवही कथन केले.

कल्पकता वाचवते पैसा
थोडी कल्पकता चांगले डिझाइन बनवू शकते. कमी खर्चातही आकर्षक रचना बनविण्याची कला आत्मसात करा, असा मोलाचा सल्ला प्रख्यात डिझायनर अंजली लोव्हेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपलब्ध जागेत रंगसंगती, खर्चाचा ताळमेळ घालून केलेली रचना ग्राहकाला समाधान देते. आपल्या व्यस्त दिनचर्येत घरी आल्यावर व्यक्तीला शांत, रिलॅक्‍स वाटलं पाहिजे. तसं झालं तर तुमच्या कलेचं चीज झालं असं समजा, असा मंत्र त्यांनी दिला.

विद्यार्थी शिक्षक म्हणतात...
‘यिन टॉक’ कार्यक्रमातून ट्रॅडिशनल डिझाईन इंडस्ट्री काय आहे, ती पुढे सुरू कशी ठेवावी, याबाबत माहिती मिळाली. 
- तेजस्विनी मापारी, जेएनईसी

या कार्यक्रमातून क्राफ्टविषयी माहिती मिळाली. इंटेरिअर डिझाइनिंग इंडस्ट्रीतील बारकावे व इतर माहिती मिळाली. जुन्या क्राफ्टच्या ग्रुपला नवे रूप कशाप्रकारे देऊ शकतो, याची माहिती मिळाली.
- जयश्री सोनार, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय

डिझाईन क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी ‘यिन टॉक’ हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण होता. कार्यक्रमातील मान्यवरांनी डिझाईन क्षेत्र काय आहे याची योग्यरीत्या माहिती दिली. याचा आम्हाला भविष्यात उपयोग होईल.
- गौरी चव्हाण, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय

जुन्यापासून नवीन डिझाईन कसे तयार करायचे असे सगळे बारकावे आणि त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. एक चांगला उपक्रम या माध्यमातून ‘यिन’ने घेतला.
- संदीप जरक, मत्स्योदरी महाविद्यालय

डिझाईन क्षेत्रात बाहेरच्या जगात काय चालू आहे ते आपल्याकडे मुलांना कळावे, यासाठी असे उपक्रम वारंवार होणे गरजेचे आहे. डिझाईन क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. 
- शुभा महाजन, संचालक, एमजीएम खादी सेंटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com