अतिवृष्टीने दिला स्वप्नाला तडा, पण जिद्दीने युवा शेतकऱ्याने सात एकरावर केली पुन्हा पपईची लागवड

सुधीर कोरे
Wednesday, 25 November 2020

अभियंत्याची पदवी प्राप्त करूनही नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रयोग करीत फळबागेकडे वळलेल्या जेवळी (ता.लोहारा) येथील युवा शेतकऱ्याचे शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने स्वप्नाला तडा दिला.

जेवळी (जि.उस्मानाबाद) : अभियंत्याची पदवी प्राप्त करूनही नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रयोग करीत फळबागेकडे वळलेल्या जेवळी (ता.लोहारा) येथील युवा शेतकऱ्याचे शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने स्वप्नाला तडा दिला. कष्टाने वाढवलेले चार एकर पपई बागेचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव तसेच पावसाच्या जोरदार माऱ्याने झाडाचे पाने झडल्याने आता फळे अवेळी परिपक्व होऊन मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.

निसर्गाच्या अवकृपेने हातातोंडाला आलेला उत्पन्न हिरावल्याने या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु या युवा शेतकऱ्यांनी खचून न जाता पुन्हा सात एकर पपई लागवड करून अशा संकटाने हरलो नसल्याचे संदेश इतर शेतकऱ्यांना दिला आहे. जेवळी येथील बसवराज वेलदोडे हा चार वर्षांपूर्वी पुणे येथून अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक) पदवी घेऊन गावी परतला. या युवकाने नोकरीच्या मागे न लागता वडील राजशेखर वेलदोडे व लहान भाऊ विश्वराज वेलदोडे यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञान कास धरीत, नव-नवीन प्रेयोग करीत फळबागा फुलविल्या आहेत. परिसरात कमी पाण्यात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करणारा युवा शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

प्रथमतः त्यांनी तीन वर्षांपासून आपल्या शेतात अधिक पाणी घेणारे ऊसाची लागवड पूर्णपणे बंद केले आहे. त्यांच्याकडे बेचाळीस एकर शेती असून सध्या ड्रॅगन फ्रुट अर्धा एकर, लिंबू दोन एकर, पेरु चार एकर, सीताफळ सात एकर व पपई चार एकर आहे. कमी पाण्यावर कष्ट व योग्य नियोजन करीत बागा टिकून ठेवले आहेत. दहा महिन्यांखाली लागवड केलेली ही चार एकर पपई तैवान ७८० या जातीचे आहे. रोप लावणे, खत- औषध फवारणी, मजूर, मशागत यासाठी जवळपास आतापर्यंत तीन लाख रुपये खर्च आला आहे.

यातून जवळपास बारा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसाळ्याच्या शेवटाला झालेल्या अतिवृष्टीने कष्टाने वाढवलेले या चार एकर पपई बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी बदलत्या हवामानामुळे विविध रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसाच्या जोरदार माऱ्याने पपई झाडाचे पाने झडली आहेत. फळांना जोरदार मारा बसला बसल्याने आता फळे अवेळी परिपक्व होऊन मोठ्या प्रमाणात झाडावर नासून गळती लागली आहे. आता बाजारात पाठवाच्या वेळी निसर्गाच्या या अवकृपेने हातात तोंडाला आलेल्या उत्पन्न हिरावल्याने या युवा शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

 

संकटाचा पूर्ण विचार करुनच शेती कसण्यासाठी उतरलो असून खचून न जाता पुन्हा नव्याने सात एकर पपई लागवड करीत आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे जाणीव ठेवून पिक लागवडीत सातत्य ठेवले पाहिजे. एखाद्या वेळेस नुकसान झाले तरी पुढील वेळेस चांगले उत्पन्न मिळवून हे नुकसान भरून निघेल.
- बसवराज वेलदोडे, शेतकरी, जेवळी

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young Farmer Again Cultivate Papaya Osmanabad News