‘का’ आहेत अल्पवयीन मुली असुरक्षिततेच्या सावटात

File photo
File photo

नांदेड : अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर विनयभंग व अत्याचार करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे जिल्ह्यात चित्र निर्माण झाले आहे.  कायद्याचा धाक नसल्यामुळे सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

समाजातील विकृत प्रवृत्तीचा सामना अल्पवयीन मुलींना करावा लागतो आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यावर जवळचे नातेवाईक, शेजारी, सोबत शिकणाऱ्या  समवयस्क समवयस्ककडूनही आत्याचार केला जातो. परंतु, बऱ्याच वेळी भीतीपोटी त्या बोलत नाहीत. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ त्यांना सोसावा लागतो. दडपणामुळे मुलींच्या मनावर मानसिक परिणाम होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांनी सजगता दाखवून आपल्या आपल्यावर लक्ष ठेवण्याची, संवाद साधण्याची वेळ येऊन ठेपली आहे.  

सोशल मीडियाचा परिणाम
अलीकडच्या काळात मोबाईल, सायबर कॅफे, सोशल मीडिया, सिनेमा यांचा विपरीत परिणाम युवा पिढीवर जाणवत आहे. त्यामुळे कुठलाही विचार न करता वाहवत जाण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. पालकांकडूनही मुलांना बरीच सवलत व मुभा दिली जाते.  त्यामुळे स्वैरापण वाढत आहे . अनेक अल्पवयीन मुले मुली शाळा-कॉलेज व शिकवणी वर्ग सुटल्यानंतर कुठेतरी निवांत शोधून तासनतास वेळ घालवितात.  नांदेड शहरात असे प्रकार अलिकडे वाढीस लागले आहेत. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत ही पाळेमुळे रुजली जात आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलींचे पलायन व पळवून नेण्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे.

कायद्याचा धाक बसेना 
‘दंगल’ चित्रपटातील ‘छोरीया छोरों से कुछ कम नही’ या संवादाचा प्रत्यय आज स्पष्टपणे दिसून येत आहे.  परंतु, ही स्थिती फक्त रंजनापुरता मर्यादित न राहता मुलींनी सक्षम, सजग व धैर्य बाळगण्याची वेळ आली आहे.  सोबतच समाजाची विकृत मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बाललैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी अत्यंत कठोर कायदेही करण्यात आले. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. असे असतानाही अशा घटनांची संख्या कमी झालेली दिसत नाही. त्यामुळे केवळ कायदे करून चालणार नाही तर त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीही होण्याची गरज आहे.  

पोलिस-नागरिक नातं सुधारलं पाहिजे
नांदेडसारख्या महत्त्वाच्या शहरांत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्याकरता यंत्रणेमध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे, रिक्त असलेल्या पोलिसांच्या जागी तात्काळ नेमणूक होणं गरजेचं आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील नातं सुधारलं पाहिजे. यासाठी जागरूकता आणि परस्पर विश्वास निर्माण करणं अत्यावश्यक आहे.
- अश्‍वीनी कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या)

अल्पवयीन पिडितांच्या संख्येत वाढ
अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. कधी घरातील, नात्यातील वासनांध व्यक्ती, तर कधी शेजाऱ्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. घरात आणि बाहेरसुद्धा लहान मुली असुरक्षित असल्याचा प्रत्यय वारंवार घडणाऱ्या घटनांमधून येऊ लागला आहे. 
- सुदर्शना सोनवणे पाटील (सामाजिक कार्यकर्त्या)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com