बीड जिल्ह्यात तरुणाचा धारदार शस्त्राने खून, आष्टीत दुसरी घटना 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

पिंपरखेड येथे अज्ञात व्यक्तीने तरुणाचा धारदार शास्त्राने गळा व गालावर वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. एकाच महिन्यातील खुनाची ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कडा (जि. बीड) - आष्टी तालुक्यातील कानडी (बुद्रुक) येथे मागील पंधरा दिवसांपूर्वी खून झाल्याने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असतानाच मंगळवारी (ता. २३) सकाळी पुन्हा पिंपरखेड येथे अज्ञात व्यक्तीने तरुणाचा धारदार शास्त्राने गळा व गालावर वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. एकाच महिन्यातील खुनाची ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी बीडचे अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी भेट देऊन पाहणी केली. रामदास पांडुरंग चव्हाण (वय३५) असे मृताचे नाव आहे. पिंपरखेड येथील आपल्या जनावरांच्या गोठ्यात मृत रामदास चव्हाण नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री झोपले होते. त्यांचा अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री धारदार शस्त्राने खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

नेमका खून का व कशासाठी केला, याचा तपास अंभोरा पोलिस करीत आहेत. मृताची कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन सुपूर्द करण्यात आला. मृताची पत्नी स्वाती चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतास एक विवाहित मुलगी, एक मुलगा, पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man killed with sharp weapon in Beed district, second incident in Ashti