नव्वदीच्या उंबरठ्यावरील ‘तरुण’ धडपडतोय ज्येष्ठांसाठी...

संजय बर्दापुरे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

-कोषागार कार्यालय ते बँकेतील सर्व कामासाठी असतो पुढाकार
-सहकारी ज्‍येष्ठांच्‍या मदतीसाठी करतात काम 

वसमत : नव्‍वदीच्‍या उंबरठ्यावर असलेल्‍या सेवानिवृत्त कोसलगे काकांची आपल्‍या सहकारी ज्‍येष्ठ व वयानुसार विकलांगपण आलेल्‍या सेवानिवृत्तांसाठी चालवलेली २८ वर्षापासूनची कुठलीही अपेक्षा न ठेवता केली जाणारी मदत शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. आजच्‍या व्‍यावसायिक बनलेल्‍या समाजाला नवी दिशा देणारी तर तरूणांमध्ये स्‍फुर्ती जागवणारी काकांची ही मदत अनेकांंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वसमत येथील राजेंद्र त्र्यंबकराव कोसलगे (वय ८६) हे ग्रामविकास अधिकारी या पदावरून ३० जून १०९२ रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, त्‍यापूर्वी त्‍यांनी ज्‍येष्ठ सेवानिवृत्तांची तसेच वयोमानानुसार विकलांगपण असलेल्या सेवानिवृत्तांची बँकेत पैसे काढणे, स्‍लिप भरून देणे, कोषागार कार्यालयाचा हयात असल्‍याचा फॉर्म भरून देणे आदी बाबतची होणारी परवड अनुभवली होती. त्‍यामुळे त्‍यांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा आपल्‍या सहकारी ज्‍येष्ठांच्‍या मदतीसाठी घालवायचा असा निश्‍चय केला.

महाराष्ट्रात कुठेही दुसरी शाखा नसलेल्‍या पेन्‍शनर संघटनेमध्ये त्‍यांनी सचिवपदाचा कारभार सांभाळला. त्‍यांच्‍यासोबत त्‍यांना मदत करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक कै. बाबूराव काळे, डि.जे.चिलवंत यांची मोलाची साथ राहिली. मागील वर्षी बाबुराव काळे यांचे निधन झाल्‍यानंतर सध्या कोसलगे काकाबरोबरच डि.जे.चिलवंत हे साथ देत आहेत. विशेष म्‍हणजे वयाच्‍या नव्‍वदीच्‍या उंबरठ्यावर असलेल्‍या कोसलगे काकांनी आजपर्यंत कुठलीही अपेक्षा न ठेवता बँकेच्‍या बाहेर आपला टेबल ठेवून येणाऱ्या सहकाऱ्यांना लिखापडीच्‍या कामासहीत हाताला धरून काउंटरपर्यंत नेण्यापासून ते पैसे मिळवून देण्यापर्यंत सेवा बजावली आहे. 

वसमत तालुक्‍यात एक हजार ४८ पेन्‍शनधारक
वसमत तालुक्‍यात एकून एक हजार ४८ पेन्‍शनधारक असून त्‍यांची महिन्‍याच्‍या एक ते तीन तारखेपर्यंत निवृत्ती वेतन उचलण्यासाठी गर्दी उसळत असल्‍याने त्‍यांना या तिन्‍हीही दिवशी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत मदत चालू ठेवावी लागते. 

सेवेबरोबरच आरोग्‍यही जपले
वयाची ८६ वर्ष पुर्ण केलेले कोसलगे काका आरोग्‍याचे गुपीत विचारणाऱ्यांना शासकीय नियमानुसार ३८ वर्ष सेवा बजावून वेतन घेतले. आता ३८ वर्ष सेवानिवृत्त म्‍हणून वेतन घ्यायचे आहे असे निर्धास्‍तपणे सांगतात. तेंव्‍हा खरोखरच त्‍यांची ज्‍येष्ठांसाठीची तळमळ व कनखर आरोग्‍याचा अभिमान वाटतो. 

काकांची दैनदिनी
सायंकाळी सुर्यास्‍तापूर्वी जेवन केल्‍यानंतर रात्री साडेसात ते आठ या वेळेत झोपणे. त्‍यानंतर सकाळी तीन वाजता उठून हलका व्‍यायाम केल्‍यानंतर आंघोळ, पूजा झाल्‍यानंतर हलका आहार घेऊन सकाळी सहा वाजता बँकेसमोर कामाला सुरूवात. 

शासनाकडून अपेक्षा
तालुकाभरातील सेवानिवृत्त बांधव वसमत येथे निवृत्तीवेतन घेण्यासाठी येतात. परंतू बऱ्याचवेळा त्‍यांचे एका दिवशी काम होत नाही अशा वेळी आधीच थकलेले व विकलांगपण आलेल्‍या बांधवांची फरपट होते. त्‍यासाठी आम्‍ही वसमत येथे पेन्‍शन भवन उभारावे या बाबतचा प्रस्‍ताव आमदार, खासदारांना दिला होता. मात्र, अद्याप कोणत्‍याही लोकप्रतिनिधींनी आमच्‍या मागणीकडे गांभिर्याने पाहिेले नाही. -श्री. राजेंद्र त्र्यंबकराव कोसलगे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the young, the 'young' is pushing in the nineties ...