esakal | मोठ्या भावाच्या जबर मारहाणीत लहान भावाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

beed

मोठ्या भावाच्या जबर मारहाणीत लहान भावाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आष्टी : स्वस्त धान्य दुकान आपल्याला मिळावे यासाठी सख्ख्या मोठ्या भावाने लहान भावाला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले असता उपचारादरम्यान लहान भावाचा अखेर मृत्यू झाला. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.१) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यातील भोजेवाडी येथील ज्ञानदेव आश्रुबा खटके यांचे बंधू लक्ष्मण अश्रूबा खटके यांच्याकडे मागील १८ वर्षांपासून स्वस्त धान्य दुकान होते. परंतु मागील दोन वर्षांपासून हेच स्वस्त धान्य दुकान ज्ञानदेव अश्रूबा खटके याच्याकडे आले. (Beed News)

हेही वाचा: अन् पुरासोबत शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले

याच कारणामुळे दोन्ही भावात वारंवार भांडणे होत होती. सोमवारी (ता.३० ऑगस्ट) रोजी दोन्ही भावांत जबर हाणामारी झाली. यामध्ये ज्ञानदेव खटके हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (ता.१) मुत्यू झाला. या प्रकरणी मृताचा मुलगा लहु ज्ञानदेव खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण अश्रूबा खटके, बाळासाहेब लक्ष्मण खटके, भागीनाथ रामराव लकडे, मनीषा खटके, सिंधुबाई खटके, युवराज खटके, सचिन लकडे व दादासाहेब लकडे या आठ जणांवर अंभोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील लक्ष्मण आश्रुबा खटके, बाळासाहेब लक्ष्मण खटके, भागीनाथ रामराव लकडे यांना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारहाण प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर बुधवारी (ता.१) मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे हे करीत आहेत.

loading image
go to top