तुमचे ई-वॉलेट सुरक्षित आहे काय? 

मनोज साखरे
Thursday, 17 October 2019

दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शनवरून भामटे हडपतात रक्कम 

औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून, यासाठी त्यांनी नामी क्‍लृप्ती वापरली आहे. त्याद्वारे नागरिकांना गंडवले जात आहे. 

हल्ली बहुतांश जणांच्या मोबाईलमध्ये गुगल पे, फोन पे यांसारखे वॉलेट आहेत. याचा वापर पैशांच्या हस्तांतरणासाठी केला जात आहे; परंतु ऐनवेळी ट्रॅन्झॅक्‍शन झाले तर... मग आपण असा प्रयत्न करतो की तो भामट्यांसाठी पर्वणी ठरू शकतो. अर्थात युजर्सचे ट्रॅन्झॅक्‍शन अनसक्‍सेसफुल होते म्हणून ते कस्टमर केअरचा संपर्क क्रमांक गुगलवर मिळवतात; परंतु युजर्स कस्टमर केअरचा क्रमांक सर्च करतात हे भामट्यांना माहिती असतेच. अर्थात ते सर्च ऑप्टिमायझेशनचाही यासाठी वापर करतात. आपण ई-वॉलेटचा क्रमांक सर्च केल्यास भामट्यांनी फिड केलेला क्रमांक आपणास मिळतो. त्यावर आपण संपर्क केल्यानंतर हा फोन भामट्यांना लागतो.

ते बोलत असताना आपणास कस्टमर केअरचा प्रतिनिधी बोलत असल्याचे वाटते. आपण विश्‍वास ठेवून भामट्यांनी सांगितलेल्या गोष्टी करतो. त्यात दहा रुपयांचे ट्रॅन्झॅक्‍शन असो की त्यांनी सांगितलेल्या धोकादायक लिंकवर जाणे असो, आपण सर्व गोष्टी फॉलो केल्या की आपली ई-वॉलेटची माहिती भामट्यांच्या डेस्कटॉपला प्राप्त होते. भामटे आपणास फोनवर बोलता-बोलताच लिंकवर क्‍लिक करा, असे सांगून दहा किंवा इतर रुपयांचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगतात. ई-मेल आयडी, पासवर्ड टाकण्याचेही ते सांगतात. त्यांच्या रिमोटला डेस्कटॉपला ऍक्‍सेस असतो. त्यामुळे त्यांना आपला डाटा मिळतो. त्यानंतर ते ऑनलाइन ट्रॅन्झॅक्‍शन करतात. या प्रक्रियेसाठी ते विशेष सॉफ्टवेअरचाही वापर करतात. 

काय आहे एडिटिंग... 

गुगलवर पूर्वी मेजर कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर असायचे; परंतु आता कुरिअर एजन्सी, गॅस एजन्सीचेही नंबर गुगलवर असतात. त्यात एडिट करण्याची सोय असते. आता ई-वॉलेट क्रमांकही गुगलवर असल्याने भामटे या क्रमांकात एडिट करून आपले क्रमांक फिड करतात. मग ग्राहकाने सर्च केल्यास त्यांना भामट्यांचा संपर्क क्रमांक मिळतो. 

पे ऍण्ड.. 

भामटे अलीकडे गुगलवर ऍडही देतात. खासकरून जास्तीत जास्त नागरिकांच्या उपयोगातील व दैनंदिन गरजांतील संपर्क क्रमांकही त्यात असतात. काही वेबसाईटही ते ऍड करतात. आपण सर्च केल्यानंतर संपर्क क्रमांक अथवा आपणास हव्या असलेल्या वेबसाईट योग्य आहे का? हे पडताळणे गरजेचे आहे. 

अशी घ्यावी खबरदारी... 

- इंटरनेटवर संपर्क क्रमांक सर्च केल्यानंतर तो आपणास हवा असलेलाच क्रमांक आहे की नाही, याची खात्री करायला हवी. 
- गुगलवर सर्च केलेले क्रमांक योग्य वेबसाईटवरूनच घेतले की नाही, याचीही खात्री करावी. 
- एखादा क्रमांक इंटरनेटवरून मिळवल्यानंतर तो त्याच व्यक्तीचा आहे का हे तपासावे. 
- फसव्या लिंकवर जाऊ नका, ओटीपी देणे टाळायला हवे. 

अशी घ्या काळजी 

कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर अधिकृत वेबसाईटवर प्रथम शोधा. वेबसाईटची खात्री दोन-तीन सोर्सेसद्वारे करून घ्या. समजा, गुगल पेवर अडचण आली की, तुम्ही ऍपमधील हेल्प डेस्कलाच विचारा. विविध साईटवरील गुगल पेचा मोबाईल क्रमांक फसवा असू शकतो. कुरिअर कंपनी, गॅस एजन्सीचा हेल्पलाइन अधिकृत वेबसाईटवरून घेता का, ते पाहा. अधिकृत कस्टमर केअरचे नाव जाणून घ्या. त्यांचा फिजिकल ऍड्रेस विचारा. तो ऍड्रेस पडताळा. तो इतर कुणाचाही पत्ता आहे का, अधिकृत वेबसाईट पाहा. 

डिजिटल पेमेंट अभियानामुळे घरबसल्या ई-व्यवहार केले जात आहेत. काही वेबसाईट फसव्या असू शकतात. स्वस्तात मिळतेय म्हणून आपण व्यवहार करता पण वस्तू मिळेलच असे नाही. त्यामुळे ब्रॅंडेड, नामांकित, नेहमीच्याच वेबसाईटवरून खरेदी करा. रिव्ह्यूव्ह, कॉमेंट्‌स, ऍप हिस्ट्री तपासा. ऍप डेव्हलपर शोधा. वेबसाईटचा मालक शोधा. 
- राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Your E-Wallet Safe?