मधमाशांच्या हल्ल्याने झाडावरुन पडून युवकाचा मृत्यू

विकास पाटील
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

झाडावर चढलेल्या तरुणावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घोरकुंड (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता. 26) दुपारच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव मुख्तार सिकंदर तडवी (वय 40, रा. गोंदेगाव) असे आहे.

बनोटी, ता. 26 (जि.औरंगाबाद) ः झाडावर चढलेल्या तरुणावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घोरकुंड (ता. सोयगाव) शिवारात सोमवारी (ता. 26) दुपारच्या सुमारास घडली. मृत तरुणाचे नाव मुख्तार सिकंदर तडवी (वय 40, रा. गोंदेगाव) असे आहे.

गोंदेगाव येथील तरुण मुख्तार तडवी हा घोरकुंड शिवारातील शेतात शेतीकामाला जात असताना वाटेत एका निंबाच्या झाडावर मोहोळ नजरेस पडले. मोहोळ हलविण्यासाठी तो झाडावर चढला होता. झाडाच्या फांदीवर उभा राहत मोहोळ हलवत असताना मधमाशांनी हल्ला केला. एकाच वेळेस अनेक माशांनी चावा घेतल्याने तरुण घाबरला आणि फांदीवरील पाय घसरून जमिनीवर पडल्याने त्याला जबर मार लागला होता. तेथून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी तरुण जमिनीवर पडल्याचे पाहून त्याच्या शरीराची हालचाल करून बघितली तोपर्यंत मुख्तारचा प्राण गेला होता. घटनेची माहिती सोयगाव पोलिसांना देण्यात आली. त्यावरून सोयगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास पोलिस निरीक्षक सीताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुभाष पवार, योगेश झाल्टे, प्रदीप पवार, कौतिक सपकाळ, दीपक पाटील आदी तपास करीत आहेत.

कुटुंबाची परिस्थिती नाजूक

मुख्तार तडवी यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत नाजूक असून, मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते. शेतात कामाला जात असताना मोहोळ दिसेल त्या झाडावर चढून मध गोळा करून मधविक्री करीत मिळालेल्या दोन पैशांमधून कुटुंबाच्या खर्चास हातभार लावत होता. मात्र तेच मोहोळ मुख्तारच्या मृत्यूचे कारण बनले. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने पत्नी, तीन मुले, एक मुलगी पोरके झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Died After Falling