युपीएससीची तयारी अन् काळजीची परीक्षा उत्तीर्ण, युवकाने रोखला कोरोना

Latur Corona News, Latur
Latur Corona News, Latur

लातूर : दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे दोन युवक चार दिवसांपूर्वी आपल्या गावी परतले. मात्र, गावी आल्यानंतर दोन दिवसांनी दोघांपैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. मात्र, कोरोनाची बाधा झालेल्या युवकाने सतर्क राहून गावी परत येताना व आल्यानंतर घेतलेल्या पुरेपूर काळजीमुळे त्यांच्या संपर्कातील कोणालाच कोरोनाचा संसर्ग झाला नाही. बुधवारी (ता.२७) रात्री त्याच्या संपर्कातील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर भावी अधिकाऱ्याने काळजीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा अनुभव सर्वांना आला.


लातूर तालुक्यातील मसला येथील एक व भुईसमुद्रगा येथील एक असे दोघे दिल्ली येथे युपीएससीची तयारी करतात. टाळेबंदीमुळे ते दिल्लीहून गावी निघाले. ता.२१ मे रोजी दिल्लीहून मुंबईला आले. तेथून वाहनाने तुळजापूर येथे आले. तेथून दुसऱ्या वाहनाने २२ मेच्या पहाटे ते तीन वाजता गावात दाखल झाले. गावात येण्यापूर्वीच त्यांनी पूर्ण काळजी घेतली होती. यामुळे दोघांनी गावी आल्यानंतर गावच्या शाळेतच स्वतःला संस्थात्मक क्वारंटाईन करून घेतले होते. मसला येथील युवकाने तर भुईसमुद्रगा येथे आल्यानंतर भावाला फोन करून दोन दुचाकी घेऊन येण्यास सांगितले.

भाऊ व त्याचा मित्र दोन दुचाकीवर भुईसमुद्रगा येथे आले. तेथे दुरूनच त्याने एक दुचाकी ताब्यात घेतली. भाऊ व मित्र एका दुचाकीवर गेले व हा युवक दुसऱ्या दुचाकीवरून थेट गावातील जिल्हा परिषद शाळेतील वर्गखोलीत जाऊन बसला. गावी येण्यापूर्वीच युवकाने शाळेतच त्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शाळेतील वर्गखोलीची चावीही सुरक्षित अंतर ठेऊनच घेतली. दुचाकी निर्जंतुकीकरण केली. थोडाही संपर्क येणार नाही, याची काळजी घेत असतानाच युवकाला ता. २३ मे रोजी ताप आला. त्याला काहीच खाऊ वाटेना. तांदुळजाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रूग्णवाहिकेने युवकाला तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल केले. तिथे लगेच त्याचा २४ मे रोजी स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल इन्क्लुझिव्ह आल्यामुळे २५ रोजी पुन्हा स्वॅब घेऊन तपासण्यात आला. ता.२६ मे रोजी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा यांनी सांगितले.

आनंदाची बातमी: कोरोनाच्या नियंत्रणाबद्दल या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाचे होतेय...

संपर्कातील चौघेही निगेटिव्ह
युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाला जास्त कसरत करावी लागली नाही. कारण या युवकाने पुरेशी काळजी घेतली होती. तो शाळेतच क्वारंटाईन राहून कुटुंबांसह कोणाच्याही संपर्कात आला नव्हता. तरीही आरोग्य विभागाने त्याच्या संपर्कात आलेला त्याचा भुईसमुद्रगा येथील मित्र, दोघांना तुळजापूर येथून घेऊन येणारा म्हाडा कॉलनीतील चालक, तसेच कोरोनाबाधित युवकाला नेण्यासाठी आलेला त्याचा भाऊ व त्याचा मित्र अशा चौघांचे स्वॅब बुधवारी तपासणीसाठी पाठवले होते. रात्री उशिरा सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या युवकाने खरेच पुरेपूर काळजी घेतली होती, याचा प्रत्यय सर्वांना आला. यामुळे मसला येथे कंटेंटमेंट झोनही तयार करण्याची गरज पडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com