तरुणांनी वर्गणी करून कष्टकरी व पोलिसांना दिले जेवण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

बीड शहरातील कष्टकरी, पोलिसांना जेवण आणि नाश्‍ता तयार करून पाणी बाटल्याही दिल्या. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरदेखील या तरुणांनी वापरले.

बीड -  कोणी शिक्षण घेणारे, कोणी खासगी नोकरीतले. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरातच. पण, कोणाचं काय चाललंय या चर्चेतून सोशल मीडियावरील या मित्रांच्या चर्चेतून आपण घरात का होईना नीट खातोत पण कष्टकरी व रस्त्यावरील पोलिसांचे काय, असा मुद्दा समोर आला आणि या मित्रांनी वर्गणी करून कष्टकरी व पोलिस अशा दीडशे जणांना जेवण दिले. 

तरुणांच्या मनातील ही संवेदना खरोखरच प्रेरणादायी आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी आणि लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी होत आहे. रस्त्यांवर चिटपाखरू दिसायला तयार नाही. घरात बसून कोणी वाचन करतेय, कोणी अभ्यास करतेय तर कोणी सिनेमा, बातम्या पाहत आहे. असाच एक मित्रांनी तयार केलेला सिद्धिविनायक मित्रमंडळ ग्रुप आहे. त्यातले काही शिक्षण घेतात, काही खासगी नोकरी करतात. रिकाम्या वेळेत त्यांची व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा चालली आणि एकमेकांची ख्यालीखुशाली विचारून झाली.

हेही वाचा - कोरोना विषाणू लातूरमध्ये येऊच नये म्हणून....

याच वेळी आपण तर घरात का होईना पोटभर खात आहोत; पण कष्टकरी आणि आपल्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांचे काय, असा मुद्दा पुढे आला. यावर चला तर मग आपण वर्गणी करून त्यांना जेवण देऊ, असे ठरले. बघता बघता सर्वांनी पैसे एकत्र केले आणि रविवारी (ता. २९) शहरातील कष्टकरी, पोलिसांना जेवण आणि नाश्‍ता तयार करून पाणी बाटल्याही दिल्या. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरदेखील या तरुणांनी वापरले.

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

नाळवंडी नाका, बसस्थानकाच्या मागे या ठिकाणच्या महिला व पुरुष मजुरांना पुरीभाजी, नाश्ता व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. सिद्धिविनायक मित्रमंडळाचे आशिष काळे, विवेक थिगळे, प्रसाद पाटील, प्रमोद जोशी, मुकेश पुराणिक, गिरीश पुराणिक, मंदार कडेकर, श्‍यामसुंदर मुळे, कैलास हरी, अनिकेत हरी, अथर्व हरी, कौस्तुभ देशमुख, शंतनू जोशी, प्रसाद रामदासी, अमोल पाठक, रवींद्र थिगळे, मिलिंद मुळे या तरुणांची संवेदना प्रेरणादायी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth provided food for the hard-working and the police