भानुदासनगरातील तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

करिअरची चिंता सतावत असल्याने तीन महिन्यांपासून मानसिक संतुलन बिघडले आहे. नैराश्‍य अवस्था असल्याने आपण जगाचा निरोप घेत आहोत.

औरंगाबाद - करिअरची चिंता सतावत असल्याने तीन महिन्यांपासून मानसिक संतुलन बिघडले आहे. नैराश्‍य अवस्था असल्याने आपण जगाचा निरोप घेत आहोत. ‘स्वामी समर्थ मी येतोय आपल्या भेटीला,’ अशी सुसाईड नोट लिहून तरुणाने शनिवारी (ता. २५) रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. 

जवाहर कॉलनी परिसरातील भानुदासनगरात ही घटना घडली. पवन दत्तात्रय बोराडे (मूळ रा. आकणी, ता. मंठा, जि. जालना) असे त्याचे नाव आहे. डी. फार्मसीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवन भानुदासनगरात किरायाने खोली घेऊन मित्र शुभम थिटे याच्यासोबत राहत होता. आकाशवाणी चौकातील एका मेडिकलमध्ये काम करून तो स्वत:चा उदरनिर्वाह चालवत होता. त्याला स्वत:चे मेडिकल दुकान टाकायचे होते; पण तेवढा पैसा त्याच्याकडे अथवा कुटुंबीयांकडेदेखील नव्हता. आर्थिक परिस्थितीशी तो गेल्या तीन महिन्यांपासून झुंज देत होता. फार्मासिस्ट असताना देखील आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. या विचाराने तो ग्रासला होता. सतत अपयशाला सामोरे जावे लागत असल्याने त्याचे मानसिक संतुलनही बिघडले होते. अखेर नैराश्‍यातून त्याने मृत्यूला कवटाळण्याचे ठरवले. रात्री मित्र खोलीवर नसताना त्याने छताच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार रात्री दोनच्या सुमारास उघडकीस आल्यावर त्याला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth suicide in bhanudasnagar aera