इच्छुक जोमात; नेते कोमात

- शेखलाल शेख
रविवार, 29 जानेवारी 2017

भाजप-शिवसेनेला मतविभाजनाचे टेन्शन; कॉंग्रेस-राष्ट्रवादीची बहुतांश गटांत होणार आघाडी

भाजप-शिवसेनेला मतविभाजनाचे टेन्शन; कॉंग्रेस-राष्ट्रवादीची बहुतांश गटांत होणार आघाडी
औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाला. त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते जोमात; तर मतविभाजनाच्या चिंतेने दोन्ही पक्षांतील नेते कोमात गेलेत. दुसरीकडे युती फिसकटणार असल्याची चाहूल लागल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने अगोदरच आघाडीसाठी हालचाली केल्या होत्या. त्याला यशसुद्धा मिळाले. गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्‍यांत आघाडी निश्‍चित आहे; तर कन्नड, खुलताबाद, औरंगाबाद तालुक्‍यातील काही गटांत आघाडीसाठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिवसेना - भाजपला फटका; तर कॉंग्रेस- राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेच्या लॉटरीची संधी निर्माण झाली आहे.

यापूर्वी वर्ष 2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत 60 गट होते. यात भाजप-शिवसेना युतीचा 24-36 असा फार्म्युला होता. यात भाजपने सहा; तर शिवसेने 17 जागा जिंकल्या होत्या. नंतर झालेल्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार विजयी झाल्याने ही संख्या 19 झाली. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ताकद वाढल्याचा दावा करत भाजप नेत्यांनी युतीसाठी थेट पन्नास टक्के जागांवर दावा केला. त्यामुळे शिवेसना नेत्यांच्या भुवया उंचावल्या.

औरंगाबादेत चर्चेच्या तीन फेऱ्या असफल ठरल्याने आता युती होणार नाही, हे गृहीत धरून भाजप, शिवसेनेने 62 गट आणि 124 गणांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवार असले तरी प्रत्येक तालुक्‍यात दोन्ही पक्षांची ताकद कमी-जास्त आहे. फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात प्रशांत बंब भाजपचे आमदार असले, तरी युती तुटल्याने येथील समीकरणे पूर्ण बदलली आहेत. पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे असले, तरी तालुक्‍यातील मनसे आणि इतर पक्षातील नेत्यांना भाजपने प्रवेश दिल्याने त्यांची काही गटांत शक्ती वाढली आहे.

वैजापूरमध्ये भाजपपेक्षा शिवसेनेची स्थिती चांगली आहे. कन्नडमध्ये शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आमदार असले तरी त्यांनी (कै.) रायभान जाधव विकास आघाडी करून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार उभे केले. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. त्यातल्या त्यात जाधव यांचा सर्वाधिक रोष शिवसेनेवर आहे.

सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार कॉंग्रेसचे आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी सिल्लोड-सोयगावमध्ये बाजी मारली होती. सिल्लोडमध्ये भाजपची स्थिती शिवसेनेपेक्षा बरी मानली जाते. औरंगाबाद तालुक्‍यात दहा गट असल्याने येथेसुद्धा शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसमध्ये चांगलीच फाइट होण्याची शक्‍यता आहे. एकंदर बघितले तर युती तुटल्याने अनेक गटांमध्ये मतविभाजनाचा भाजप, शिवसेनेला फटका सहन करावा लागणार आहे. युती नसल्याने बहुमतासाठी आवश्‍यक 32 हा जादुई आकडा गाठणे दोघांना जिकिरीचे होणार आहे.

युती तुटल्याचा फायदा उचलण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी केली असून, तालुका पातळीवर आघाडी करण्यासाठी बैठकांवर बैठक घेतल्या जात आहेत. गंगापूर, वैजापूर, पैठण या तीन प्रमुख तालुक्‍यांत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. खुलताबाद, कन्नड तालुक्‍यांतील काही गटांत आघाडी होण्याची शक्‍यता आहे. औरंगाबाद तालुक्‍यातसुद्धा बोलणी सुरू आहे. त्यामुळे 62 पैकी बहुतांश गटांत दोघांमध्ये आघाडी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, सिल्लोड तालुक्‍यात आमदार अब्दुल सत्तार यांचा एकछत्री प्रभाव असल्याने सिल्लोड-सोयगावमध्ये आघाडीची शक्‍यता कमीच आहे. 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत फक्त सिल्लोड तालुक्‍यातील पालोद गटात दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होती. एमआयएम मैदानात असल्याने अगोदर दोन्ही कॉंग्रेसला मतविभाजनाची धास्ती होती. त्यातच युती तुटल्याने आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिवात जीव आला असून, पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीत गट, गण संख्या
तालुका................लोकसंख्या..............जिल्हा परिषद गट..............पंचायत समिती गण

सोयगाव............105727....................3....................................6
सिल्लोड............301733...................8...................................16
कन्नड................300260...................8..................................16
फुलंब्री...............144347..................4..................................8
खुलताबाद...........102579...................3...................................6
वैजापूर...............270075..................8...................................16
औरंगाबाद............345899..................10.................................20
पैठण.................306437..................9...................................18
गंगापूर................270075..................9...................................18

Web Title: zilla parisha election tension to shivsena & bjp