भाजपने घेतल्या "झेडपी' इच्छुकांच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

औरंगाबाद - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी (ता. दहा) पक्षाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड या तालुक्‍यांतील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचा समावेश होता. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

औरंगाबाद - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी (ता. दहा) पक्षाच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये गंगापूर, खुलताबाद आणि कन्नड या तालुक्‍यांतील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांतून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचा समावेश होता. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, आमदार प्रशांत बंब, सरचिटणीस संजय खंबायते, सुहास शिरसाट आणि लक्ष्मण औटी यांनी उस्मानपुरा येथील पक्षाच्या विभागीय कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मुलाखतीसाठी प्रत्येक गटासाठी सात ते आठ; तर पंचायत समितीसाठी एका गणातून दहा-दहा इच्छुक आले होते.

'शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरू आहे. मात्र, आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे पूर्वीच्या फार्मुल्यानुसार जागावाटप नव्हे; तर वाढलेल्या ताकदीच्या प्रमाणात द्याव्यात; अन्यथा स्वबळावर निवडणुका लढावी लागेल. त्यादृष्टीने आम्ही तयारी करत आहोत.''
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप.

शिवसेनेचीही मोर्चेबांधणी
शिवसेनेचे पूर्वीपासूनच ग्रामीण भागात मोठे जाळे आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व नरेंद्र त्रिवेदी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला मजबूत केले आहे. शिवसेनेकडूनही निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्हाप्रमुख अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा परिषदेच्या गटनिहाय, पंचायत समितीच्या गणनिहाय दौरे करत आहेत. शिवसेनेचे बोट धरून भाजप मोठा झाला आहे. त्यामुळे युती सन्मानाने व्हावी; अन्यथा स्वबळावरची तयारी करावी असा सूर शिवसेनेच्या इच्छुकांकडून निघत आहे.

पैठण, वैजापूर, औरंगाबादच्या मुलाखती आज
भाजप बुधवारी (ता. 11) पैठण, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्‍यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी या तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: zp interested candiidate interview by bjp