
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२५ स्पर्धेत क्वालिफायर १ लढतीत कर्णधार फिरकीपटू प्रशांत सोळंकी(३-२३) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह मंदार भंडारी(५८धावा) याने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याआधीच्या साखळी फेरीच्या लढतीत ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध ४एस पुणेरी बाप्पा संघ दोनवेळा आमने सामने आले होते.
यामध्ये नाशिक संघाने पुणेरी बाप्पा संघाला दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात ४एस पुणेरी बाप्पा संघ आपली पराभवाची मालिका खंडित करण्यास उत्सुक होते. परंतु ईगल नाशिक टायटन्स संघाने ४एस पुणेरी बाप्पाविरुद्ध विजय मिळवत आपली अपराजित राहण्याची मालिका कायम राखली.