पुणे, ता. ११ : पुणे वॉरियर्स संघाने अदाणी महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील साखळी सामन्यांत सलग पाच विजयाला गवसणी घालत अव्वल स्थान कायम राखले. इशिता खळे (१-१३) हिने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीसह श्वेता सावंत (३० धावा) व अक्षया जाधव (नाबाद २९ धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. या पराभवामुळे रत्नागिरी जेट्सचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने ही प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू आहे.