
- प्रशांत केणी
पहिल्यावहिल्या महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) विजेतेपदावर पुणे वॉरियर्सने नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेली अनुजा पाटील पुण्याच्या विजेतेपदाची शिल्पकार ठरली.
बऱ्याचदा अंतिम सामने हे एकतर्फी ठरतात; परंतु हा सामना त्याला अपवाद ठरला. सोलापूर स्मॅशर्स जेतेपदाला गवसणी घालणार हे जवळपास निश्चित झाले होते; पण संघनायिका अनुजाच्या चमूला ते नामंजूर होते.
अनुजाने आधी फलंदाजीत ३० धावांचे योगदान दिले आणि नंतर अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर उंच फटके खेळण्याची क्षमता असलेल्या शाल्मली क्षत्रियला स्वत:च्याच चेंडूवर झेलबाद केले, तर शेवटच्या चेंडूवर स्वांजली मुळेला धावचीत केले. त्यानंतर पुणे वॉरियर्सने अभूतपूर्व जल्लोष साजरा केला.