गेले सांगायचे राहुनी!

आसावरी प्रमोद कुलकर्णी
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगायला हवं असतं, पण सांगायचं राहूनच जातं. मग रुखरुख लागते.

सांगायला हवं असतं, पण सांगायचं राहूनच जातं. मग रुखरुख लागते.

नुकताच एका नामवंत गायिकेच्या मैफलीला जायचा योग आला. मैत्रीणही बरोबर होती. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत चालला होता. पुरीया, शामकल्याण अशा एकाहून एक सरस रागांचं सादरीकरण त्यांनी केलं. मधेच एक बहारदार ठुमरी झाली. शेवटी भैरवीतील "बरसे बदरीया सावनकी' या भजनांनं तर कळसच गाठला. त्या गानसमाधीतून मी बाहेर आले आणि मैत्रिणीला म्हटलं, ""चल, आपण त्याचं कौतुक करूया!'' मैत्रीण म्हणाली, ""आता? अगं किती वाजलेत बघ! घरी सर्व जण वाट बघत असतील. आधीच उशीर झालाय!'' शेवटी त्यांना न भेटताच परत आलो. असं बऱ्याच वेळा होतं! ज्या गायिकेनं आपल्या जादुई आवाजानं दोन तास खिळवून ठेवलं, तिच्यासाठी फक्त दहा मिनिटे वेळ काढणंही जिवावर यावं!

एकदा आम्ही कुलू-मनाली येथे गेलो होतो. जेवण झाल्यावर रूममध्ये आल्यावर माझ्या लक्षात आलं, की माझं कानातलं सोनफूल तेथेच कुठेतरी पडलं. मालकाला सांगितल्यावर त्यानं एका मुलाला आम्ही जेथे जेवायला बसलो होतो त्याच्या आसपास बघायला सांगितलं. त्या मुलाला ते सापडलं. त्यानं प्रामाणिकपणे मला आणून दिलं. खरं तर त्याला ताबडतोब बक्षीस द्यायला हवं होतं. पण, मी विचार केला, की उद्या हॉटेल सोडताना देऊ. दुसऱ्या दिवशी पहाटेच निघाल्यामुळे त्याची गाठीभेट झाली नाही आणि मनाला रुखरुख लागली. त्या दिवशी मात्र ठरवलं, की यापुढे मनापासून जे वाटतं ते ताबडतोब करून मोकळं व्हायचं!

आपल्या घरातील लोकांना मनातलं काही तरी सांगायचं राहून जातं. जुही चावलाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं तिची आई अमेरिकेत तिच्याबरोबर होती. अपघातात आईचं निधन झालं, तेव्हा जुही म्हणाली, ""आई, तू मला किती आवडतेस, तू माझ्यासाठी किती केलंस, हे मी तुला कधीच सांगितलं नाही गं! सांगायचं राहूनच गेलं!''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aasawari kulkarni write article in muktapeeth