नकळत कळले!

अब्दुलहमीद मुलाणी
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

निव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येतील अशा काही घटना असतात. पण, ते नकळत मिळालेले संदेश असू शकतात.

निव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येतील अशा काही घटना असतात. पण, ते नकळत मिळालेले संदेश असू शकतात.

वडील आजारी होते. कोरेगावहून त्यांना साताऱ्याला हलवले. आजार जास्त बळावल्याने पुण्यातील रुग्णालयात घेऊन गेलो. पण, तेथे उपचार होऊ शकत नसल्याने दुसऱ्या दवाखान्यात हलविणे भाग पडले. दोन दिवसांनी रुग्णालयाच्या मुख्य डॉक्‍टरांनी आम्हाला सर्व सविस्तर माहिती दिली. काही रिपोर्टची ते वाट पाहत होते. रिपोर्ट आले. पुढची कृती दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती. तर, आदल्या संध्याकाळी पाच वाजता माझा धाकटा भाऊ अचानक रडायला लागला. त्याला घेऊन मी तातडीने रुग्णालयात पोहोचलो. भावाला अचानक रडू फुटले होते, त्याच वेळी वडिलांनी प्राण सोडला होता.

माझी बदली विदर्भात झाली होती. एकदम परक्‍या शहरात जावे लागले. दोन दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यानंतर खोली शोधावी म्हणून शहरात गेलो. एका गृहस्थाचा पत्ता विचारण्याकरिता मी एका वृद्ध माणसाला नमस्कार करून चौकशी केली असता, ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. ते गृहस्थ दोन महायुद्धात लढलेले होते. त्यांना दोन विवाहित मुली होत्या, पण मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ मुलगा मानून केला. त्यांना युद्धात मिळालेली पदके मला दाखविली, पण त्यांना निवृत्तिवेतन कमी मिळत होते. मी त्यांची सर्व माहिती घेऊन पुणे येथील सैनिक बोर्डात ओळखीने गेलो. सर्व माहिती तेथील अधीक्षकांना सांगितली. त्यांनी तातडीने चौकशी चालू केली. माझ्या गैरहजेरीत तेथील सैनिक बोर्डातील अधिकारी गाडी घेऊन त्या गृहस्थांना शोधत गेले आणि तातडीने फरकासह सर्व निवृत्तिवेतन वाढवून दिले. तेरा बिघा शेतीसुद्धा मिळाली. त्यांनी सर्व हकिगत मला आनंदाने सांगितली. काही काळाने माझी बदली पुण्यास झाली. मी अजमेरला असताना अचानक तीच व्यक्ती स्वप्नात आली. मला मिठी मारली. आशीर्वाद दिला. घरी आल्यावर पत्नीला स्वप्न सांगितले. तर तिने लगेचच मला एक पत्र दाखविले. त्यांच्या निधनाची वार्ता होती त्या पत्रात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abdulhamid mulani write article in muktapeeth