महापौर येती घरा...

अलका जयंत आठले
मंगळवार, 25 एप्रिल 2017

आपल्या घरी शिकवणीला येणारी एक मुलगी, भिशी ग्रुपमधली मैत्रीण महापौर झाल्यामुळे होणारा आनंद लपवण्यासारखा नाहीच. उलट आपल्या या मैत्रिणीच्या कौतुक सोहळ्यात रमायलाच हवे.

आपल्या घरी शिकवणीला येणारी एक मुलगी, भिशी ग्रुपमधली मैत्रीण महापौर झाल्यामुळे होणारा आनंद लपवण्यासारखा नाहीच. उलट आपल्या या मैत्रिणीच्या कौतुक सोहळ्यात रमायलाच हवे.

माझ्या घरी पुण्याच्या महापौर येणार म्हणून लगबग सुरू होती. महापौर माझ्याच घरी येण्याचे कारणही तसेच होते. मी बी. एड्‌. झाल्यावर घरीच शिकवणी वर्ग सुरू केला. तेव्हा अगदी पहिलीच विद्यार्थिनी म्हणून आली ती मुक्ता लिमये. तेव्हा ती सातवीत होती. लहानपणीची माझ्या क्‍लासमधील मुक्ता म्हणजे एक लाजरी-बुजरी, अबोल, खाली मान घालून बसणारी, अतिशय मृदुभाषी मुलगी. त्यामुळे आता मी जेव्हा तिची रेडिओवर किंवा सभांमध्ये भाषणे ऐकते, तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्‍वासच बसत नाही!

मुक्ता तिच्या गरवारे शाळेतील मैत्रिणींमध्ये एकदम मोकळ्या स्वभावाची होती. तिची शाळेतील मैत्रीण गौरी मुक्ताबद्दल अगदी भरभरून बोलत असे. तिचे सोनेरी-सोनेरी केस, गोरा-गोरा रंग यामुळे ती गौरीला खूप आवडायची. गौरीची चित्रकला यथातथाच होती. तिची चित्रकला सुधारावी म्हणून मुक्ता बराच प्रयत्न करीत असे. मैत्रिणींसह शाळेत मुक्ताबरोबरच जात येत असे. शाळा सुटल्यानंतर दहावीसाठी "अ' व "ब' तुकड्यांच्या मुलांना शाळेत विशेष शिकवणी मिळत असे. मुक्ताला हे पसंत नसे. ती म्हणायची, ""अ, ब तुकड्यांतील मुले खासगी क्‍लासला जाऊ शकतात. ती मुले थोडीफार हुशारही असतात. खरे तर जादा शिकवणीची गरज "ड', "इ', "फ' या तुकड्यांना जास्त आहे. हीच मुले फारशी खासगी क्‍लासला जाऊ शकत नाहीत. तेव्हा हे कोचिंग आमच्याऐवजी या मुलांना मिळणे जास्त गरजेचे आहे.'' म्हणजे समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात मिळाला पाहिजे, याची जाणीव मुक्तामध्ये शालेय जीवनापासूनच होती.

मला पीवायसीच्या वुडन कोर्टवर बॅडमिंटनचे आरक्षण 1980मध्ये मिळाले. आमचा बारा जणींचा ग्रुप तयार झाला. त्यामध्ये आमची "लिटील चॅंप' होती मुक्ता! जवळ जवळ वीस वर्षे एकत्र खेळल्यानंतर आमचा खेळ बंद पडला; मग आम्ही महिन्यातून एकदा भिशी ठरवून एक-एक मैत्रिणीकडे भेटत राहिलो. मुक्ता आमच्यात खूपच लहान असूनही आमच्या भिशी ग्रुपमध्ये सामील झाली. ती ग्रुपमध्ये आमच्याशी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारते. राजकारण सोडून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्यास तिला जास्त आवडते. आमचा ग्रुप सहलीसाठी बाहेर पडला, की मुक्ता अगदी वेळात वेळ काढून सहभागी होते. मग भेळ तयार करणे, बैलगाडीतून फिरणे वगैरे सर्वांत तिचा पुढाकार ठरलेला. मुक्ता लिमयेची पुढे मुक्ता टिळक झाल्यानंतरही तिचे आमच्या ग्रुपबरोबरचे नाते कायम राहिले.

याच ग्रुपने माझ्या घरी आमच्या "महापौर' मुक्ता टिळक यांचे कौतुक करायचे ठरविले होते.
संध्याकाळी सहाच्या सुमारास महापौरांच्या लाल दिव्याच्या गाडीतून मुक्ता टिळक उतरल्या. हसतमुख चेहरा, फिकट मोतिया रंगाची साडी, गेटवरच आम्ही सर्व मैत्रिणींनी हसून व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. "महापौर येती घरा...' असे असल्याने सर्व वातावरण आनंद व उत्साहाने भरून गेले होते. अत्तर, गुलाल, गजरे, ओटी, आंब्याची डाळ, पन्हे, ओल्या नारळाची करंजी याचा आस्वाद घेता घेता मैत्रिणींच्या महापौरांशी गप्पा खूपच रंगल्या.

नगरपालिकेतील धुरा सांभाळताना मुक्ताने प्रत्येकीला कशाप्रकारे मदत केली हे सांगण्यासाठी आम्हा सर्वांची आता चढाओढ सुरू झाली. एक म्हणाली, ""माझ्या घरासमोर रस्त्यावर फार मोठे झाड होते. थंडीत पानगळ सुरू झाली, की पानाचा सडा गच्चीत, आवारात इतका पडे, की झाडता झाडता माळी अगदी कंटाळून जाई. दरवर्षी नोकर या दिवसांत काम सोडून जाई. महापालिकेच्या उद्यान विभागात चार-पाच वेळा अर्ज करून झाले, पण व्यर्थ. झाडाचा विस्तार कमी करण्यासाठी आवश्‍यक ती उंच शिडी नाही असे सांगण्यात आले. शेवटी मुक्ताकडे गाऱ्हाणे सांगितले. तिने ताबडतोब येऊन, झाड प्रत्यक्ष पाहून उद्यान विभागातील लोकांना सूचना दिल्या. आणि लगेच काम झाले.''

दुसऱ्या मैत्रिणीचे आई-वडील निवृत्तीनंतर शांत जीवनासाठी मुंबईहून पुण्याला स्थायिक झाले. दोघेही वयस्कर. बिल्डरने त्यांच्याकडे फ्लॅटसंबंधीच्या आवश्‍यक दस्ताच्या फक्त झेरॉक्‍स प्रती दिल्या. मूळ दस्त मिळालेच नव्हते. हे दस्त मिळविण्यासाठी संबंधित कार्यालयात खेटे घालण्याचे आई-वडिलांचे वय नव्हते. त्यामुळे ते मिळवणे राहून गेले. वीस-पंचवीस वर्षांनी जेव्हा मूळ दस्तांची जरुरी भासली तेव्हा त्यांच्या पुण्यातील मुलीला हे करणे क्रमप्राप्त होते. वारंवार खेटे घालूनही काम होत नाही हे लक्षात आल्यावर तिने मुक्ताकडे धाव घेतली. मुक्ताने लगेचच संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला व या प्रकरणात जातीने लक्ष घालण्यास सांगितले. त्यानंतर मात्र सर्व सूत्रे वेगाने हलली. दोन-तीन आठवड्यांत दस्ताची मूळ प्रत हाती लागली.

अशी आमची मुक्ता पुण्यनगरीची महापौर झाली आहे! पुणे शहरापुढील नवीन आव्हाने पेलण्यासाठी आमच्या मुक्ताला उदंड आयुष्य, आवश्‍यक बळ, मानसिक धैर्य व सर्वांचे साहाय्य लाभो. तिला उदंड यश मिळो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

Web Title: alka aathale write article in muktapeeth