तुम्ही ब्रँड आहात की प्रॉडक्ट?

डॉ. मृणालिनी नाईक
Thursday, 24 September 2020

महाभारतातील एका अतिशय लोकप्रिय न म्हणता ओळखीचं असं पात्र आपण अभ्यासून पाहुयात. ते पात्र म्हणजे गांधार देशाचा राजा शकुनी. महाभारतातल्या व्हिलन मामांपैकी एक.

आपण सहसा ज्या वस्तूंचा वापर करीत असतो ती वस्तू आपण का वापरत आहोत याचा आपण विचार करीत नाही. वा विचार करण्याचा विचारच केला नाही. एक सांगू का, प्रत्येक वस्तू वा व्यक्ती आपण दोन भागांत विचारांत आणू शकतो आणि ते दोन भाग म्हणजे ब्रँड आणि प्रॉडक्ट म्हणजे तुम्ही समोरच्याला काय विकत आहात हे यावर अवलंबून आहे की तुम्ही ब्रँड आहात की प्रॉडक्ट. थोड पेचाच वाटेल, पण प्रत्येक वेळी आपण एखादी वस्तूच समोरच्याला विकत असतो असे नाही. आपण स्वतःच निरीक्षण केलं तर नक्की कळेल. आपला स्वभाव आणि आपली व्यवस्थापन करण्याची शैली ही पण पुढे किती महत्वाची आहे तेही मग लक्षात येईल.

आता या विचाराला एक आधार म्हणून महाभारतातील एका अतिशय लोकप्रिय न म्हणता ओळखीचं असं पात्र आपण अभ्यासून पाहुयात. ते पात्र म्हणजे गांधार देशाचा राजा शकुनी. महाभारतातल्या व्हिलन मामांपैकी एक. असे म्हणतात की शकुनी तिथे त्याच्या बहिणीच एका आंधळ्याशी लग्न लावल्यामुळे वचपा म्हणून आला होता. तर एक कहाणी अशीही सांगते जी व्यासांनी कुठेच नमूद केलेली नाही आणि ती म्हणजे शकुनी तिथे त्याचे वडील आणि भावांच्या हालअपेष्टा आणि मृत्यूचा वचपा घ्यायला म्हणून राहत होता. असे म्हणतात

भीष्मांनी शकुनीचे वडील आणि त्याच्या सहित त्याचे भाऊ यांना कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांना अन्नाचा पुरवठा कमी होत असे आणि त्यावेळी त्याच्या वडिलांनी म्हणजे सुबाहूनी अन्न शकुनीला पुरवावे असाच बेत केला कारण सगळ्यांमध्ये शकुनी एक असा होता जो हुशार आणि चपळ बुद्धी होता. तेव्हा असे म्हणतात की आपला जीव देऊन त्यांनी शकुनीला जिवंत ठेवला तो कुरु वंशाचा पुढे नाश करता यावा म्हणून. आणि शकुनीने त्याच्या जिवंत असण्याचं कारण विसरू नये म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याचा पाय तोडला होता. पुढे मग त्याच्या वडिलांच्या हाडाचे फासे आणि शकुनीचा खेळ मग सगळ्यांनाच माहिती आहे. हे सुबाहूच मरणापूर्वी कुरु वंशाच्या नाशासाठी करून ठेवलेल व्यवस्थापन होतं असाही आपण तर्क लावूयात.

आता या उदाहरणाचा संदर्भ काय आणि याचा अर्थ काय ? तर याचा अर्थ असा की शकुनी हा एक प्रॉडक्ट होता. आणि ज्या कारणासाठी हा तिथे आला होता वा पाठवल्या गेला होता ते तो करीत होता. त्याशिवाय त्याचा तिथे दुसरा काही असा उपयोग नव्हता. हो दुर्योधनाचे कान भरण्याशिवाय.

संकट, परिस्थिती आणि बरंच काही यासाठी षड्यंत्र करून पुढे आयुष्य घालवण्याला समाधान किती मिळत असेल नसेल हे ती व्यक्तीच सांगू शकते. असे कितीतरी शकुनी आपल्याला आपल्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी वा घरी मिळत असतात. त्याच्या वागण्याबोलण्याकडे आपण किती लक्ष द्यायचं आणि किती कानाडोळा करायचा हे आपल्यालाच ठरवायचं असत. असे मग जर आपले सल्लागार असतील तर आपला कौरवपक्ष झाल्याखेरीज राहणार नाही. आहे ना ?

मग ब्रँड कोण ? अजून कोण तोच आपला कृष्ण. समस्यांचे निवारण करणारा आणि प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन करणारा. लहानपणापासून कितीतरी संकट कृष्णाने पाहिली पण वचपा काढावा अशी वागणूक त्याची कोणी नमूद करू शकला नाही. काही म्हणतील ही मग कृष्ण काय करत होता. तर थोडा कटाक्ष टाकला तर तेही लक्षात येईल की कोणती संकट वा अडचणी वा शत्रू त्याने कसे हाताळले. प्रत्येक वागण्याला त्याच्या एक कारण होते. त्याची नक्कल तयार होऊ शकत नाही मग कितीही शिशुपाल येऊ देत ना. त्याला समस्या सोडवण्याची कला अवगत होती.

खऱ्या अर्थाने तो व्यवस्थापक होता पण स्वतःमध्ये तो ब्रँड होता. प्रॉडक्ट ची नक्कल कधीही करता येऊ शकते, वा आधी जसा तसा पुन्हा निर्माण करता येतो, पण ब्रँड ? तो घडत जातो त्याच्या गुणांमुळे आणि इतरांना मिळालेल्या त्याच्या आधारामुळे. पहा विचार करून आणि जर पटलं तर हे ही स्वतःला सांगता येईल की आपण कृष्ण जरी नाही तरी ब्रँड बनण्याचा विचार तर करूच शकतो. व्यवस्थापन मग नक्कीच जमेल, काय म्हणता ?
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are you brand or product?

Tags
टॉपिकस
Topic Tags: