हिंदू राष्ट्र ?? नको रे बाबा...

शिवराम गोपाळ वैद्य, पुणे.
मंगळवार, 31 जुलै 2018

केवळ कल्पना करायची झालीच तर हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणे हे कोणत्याही धर्माच्या हिताचे होणार नाही. हिंदूंच्या तर नाहीच नाही. 

2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या मार्गावर देश चालत असतांनाही हाकाटी कशासाठी करण्यात येत आहे, हे समजण्यासारखे आहे. तरीही केवळ कल्पना करायची झालीच तर हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होणे हे कोणत्याही धर्माच्या हिताचे होणार नाही. हिंदूंच्या तर नाहीच नाही. 

पूर्वीपासूनच या देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद पेटवून राजकीय पक्षांकडून सत्तेचे राजकारण केले जात होते. पण या देशातील हिंदू-मुस्लिम जनतेने अतिशय समजूतदारपणा दाखवला आणि असे स्वार्थी आणि देशविघातक प्रयत्न हाणून पाडले. तेव्हा आता अशा घटकांनी हिंदू धर्मियांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान सुरू केले आहे. काहीही असले तरी मूळ प्रश्न हा आहे की या देशातील, अगदी हिंदू धर्मियांनाही हा देश हिंदू राष्ट्र व्हावा असे वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर... अजिबात नाही. या देशातील सर्वधर्मीय जनता प्राचीन काळापासूनच सर्वसमावेशक, सोशिक आणि सहिष्णु राहिलेली आहे. याचा पुरावा देशाचा हजारो वर्षांचा इतिहास देत आहे. मात्र सत्तेच्या समीकरणांनी या देशातील जनतेमध्ये, धर्माच्या, जातीच्या, पंथांच्या, प्रांतांच्या, भाषांच्या नावाखाली फूट पाडण्यास सुरवात केली. तेव्हापासून या देशात अस्थिरता, अनागोंदी आणि अन्याय याची परिसीमा झाली आहे. एकाच धर्माच्या नेत्यांच्या हातात सत्तेचा अंकुश राहिला तर या देशात काय होईल याची कल्पनाही करणे भयावह आहे. तेव्हा हा देश हिंदूराष्ट्र न होता, खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष कसा होईल इकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. खरी धर्मनिरपेक्षताच या देशाला स्थैर्य तर देईलच पण त्याशिवाय, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता, सुरक्षितता, प्रगती, विकास, सामाजिक आणि धार्मिक एकता, कायदा आणि सुव्यवस्था या सर्व आघाड्यांवर देश कित्येक पावले पुढे जाईल. देशाच्या भावी पिढ्यांना समर्थ भारत द्यायचा असेल तर या मुद्यांवर प्रत्येक नागरीकाने विचार करायला हवा. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article About Hindu Rashtra