उजल्या बैल निकल्या नहीं बाल्या!

दिलीपराज बिराजे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

माणगावच्या मैदानाची एक खासियत होती... थोड्या थोड्या अंतरावर कोपरे असल्यामुळे वळण घ्यावे लागायचे व पुढे वळून येण्यासाठी मैदान खुलं असायचे व परत फज्ज्याला येताना एकदम तीन गाड्या पळतील असा रस्ता मोकळा असायचा. त्यामुळं गाडीवानाचा आणि बैलांचा कस लागायचा.

पूर्वी माणगावच्या बैलशर्यती म्हणजे शौकिनांसाठी सुवर्णसंधी, अधिक सुखद अनुभव असायचा. गावच्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये चार वेळा तरी शर्यतीचे आयोजन असायचे. 

गावामध्ये अनेक नामांकित बैलजोड्या होत्या. तसेच पट्टीचे गाडी हाकणारे, कासऱ्याला बसणारे, क्‍लिनर म्हणून काम करणारे आणि बैलांच्या बरोबर धावणारे धावपटू आणि सायकलपटू होते. त्यामुळे शर्यती होण्याअगोदर आठ-पंधरा दिवस गल्लीबोळांत, कट्ट्यांवर, चौकाचौकांत ‘यावर्षी कुणाची गाडी नव्याने भाग घेणार आहे, सध्या कुणाची गाडी फॉर्मात आहे, कोण गाडीवान कसा आहे, काय डावपेच करतो,’ याविषयी चर्चेला उधाण 
आलेलं असायचं.

दसरा झाला की बैलांना तालीम सुरू व्हायची. त्यामध्ये रहिमान मामाची गाडी असायची. रहिमान हा सगळ्या गावाचा ‘मामा’ होता. काही लोक त्याला चाचा म्हणायचे. हा सगळ्या गावाचा प्यारा माणूस होता. जवानीच्या काळात पैलवानकी केलेली आणि मुळातच बैलांचा छंद असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी बैलांच्या पायात नाल मारायचा, बैलांच्या पायातील खुरे काढायचा. आम्ही बारकी बारकी पोरं वडाच्या झाडाखाली बैलांना नाल कशी मारतात, ते पाहायचो. एखादा खट्याळ किंवा आडदांड बैल लवकर पडायचा नाही. तेव्हा मामा असा काय कासऱ्याचा तिडा टाकायचा की, हत्तीसारखा बैल धापकन खाली पडायचा. नाल मारणे, खुरे काढणे हे काम मामा लोक देतील, तो मोबदला घेऊन करायचा. गावच्या शर्यतीत मामाची गाडी ठरलेली असायची. ‘अ’ गट (जनरल गाड्या), ‘ब’ गावगन्ना (गावातल्या फक्त गाड्या) अशा शर्यती होत. गावगन्ना गाडीने मामाची गाडी नोंदलेली असायची. शुक्रवारी इचलकरंजीच्या जनावरांच्या बाजाराला येता-जाता, शेताकडे जाता-येता बैलांना तालीम द्यायचा. बैलं तशी काही फार भारी असायची नाहीत; पण मामाचा शर्यतीचा नाद खुळा. शर्यती आहेत, म्हटलं की, मामांना कुठलं एवढं प्रोत्साहन यायचं की, तरुणाला लाजवेल इतकी पळपळी करायचा.

दिवाळीच्या पाडव्याला गावात पाहुणेरावळे हमखास शर्यतीच्या नादाने यायचेच. मामाच्या गाडीवर स्वतः मामा कासऱ्याला (ड्रायव्हर) बसायचा आणि पाठीमागे (क्‍लीनर) म्हणून भावाच्या पोराला किंवा कुणाला तरी बसवून घ्यायचा. गाड्या सध्या जिथे हायस्कूल आहे, तेथून सुटायच्या ते रासपिटाच्या डोंगरापर्यंत जाऊन यायच्या. गावगन्ना गाड्या लक्ष्मीच्या देवळाला वळसा घालून यायच्या. माणगावच्या मैदानाची एक खासियत होती... थोड्या थोड्या अंतरावर कोपरे असल्यामुळे वळण घ्यावे लागायचे व पुढे वळून येण्यासाठी मैदान खुलं असायचे व परत फज्ज्याला येताना एकदम तीन गाड्या पळतील असा रस्ता मोकळा असायचा. त्यामुळं गाडीवानाचा आणि बैलांचा कस लागायचा.

गावकामगार पोलिस पाटलांनी एक, दोन, तीन म्हटलं की, गाड्या सुटायच्या. गाड्या सुटल्या की, नवख्या गाड्या माणसांत घुसायच्या, काही घराकडं पळायच्या, तोपर्यंत सराईत गाड्या दुसरा-तिसरा कोपरा ओलांडून जायच्या, यात एक गाडी सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची, ती म्हणजे रहिमान मामाची. गाड्या जसजशा पुढं जातील, तसतशा लोकांच्यात कुणाची गाडी पहिली येणार याविषयी पैजा सुरू व्हायच्या. 

सगळ्या गावाला वाटायचं, रहिमान मामाची गाडी पहिली आली पाहिजे; पण तसं व्हायचं नाही. मामा तिसऱ्या-चौथ्यावर यायचा. लोकं गाडीभोवती गोळा व्हायची. मामाला विचारायची, ‘‘काय झालं मामा!’’  ‘उजल्या बैल निकल्या नही बाल्या; नहीं तो मेरी गाडीच अवल थी... बाल्या क्‍या करू?’ हा मामाचा करुण आवाज बरंच काही सांगून जायचा. शर्यती अनेकवेळा होत होत्या, मामाची गाडीही असायचीच आणि दरवेळी हे ठरलेलं वाक्‍य मामा सांगायचा, ‘क्‍या करूँ? बाल्या उजल्या बैल निकल्या नही.’’ असं बरीच वर्षे ऐकतच आम्ही लहानाचं मोठं झालो; पण मामाची गाडी पहिली काही येत नव्हती. अर्थात आता मोठे झाल्यावर आम्हाला त्यामागचं खरं कारण कळतंय.

मामाचं बैलांवरचं विलक्षण प्रेम. या प्रेमापोटी मामा बैलांना मारायचा नाही, जोडीदारालाही मारू द्यायचा नाही. त्यांच्या गतीनं पळू द्यायचा, ओढून ताणून बैलांना त्रास देऊन शर्यत जिंकणं मामाला आवडत नसावं. स्वतःचा आनंद वाढविण्यासाठी बैलांना मारहाण करून शर्यती जिंकणं मामाच्या उदारमतवादी धोरणात बसत नव्हतं. मामा शेवटपर्यंत असाच खुल्या मनाने आणि अंतःकरणाने वागला, राहिला.

आज गावं बदलली, रस्ते डांबरी झाले. शर्यतीचा नाद कमी झाला. शासनाने बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली; पण दसरा-दिवाळी आली की, त्या गावच्या बैलगाडीच्या शर्यती आणि रहिमान मामाची गाडी हे सर्व हमखास आठवतात!
 

Web Title: Dilipraj Biraje writes in Muktapeeth