निवृत्तीनंतरचा विरंगुळा

डॉ. प्र. चिं. शेजवलकर
शुक्रवार, 3 मार्च 2017

शिक्षकी पेशा हा उतारवयातही आनंद देणारा असतो. विद्यार्थ्यांच्या आठवणी, प्रसंग हा निवृत्तीनंतरच्या काळातला विरंगुळा ठरतो. कोठेही जा, तुमचे जुने विद्यार्थी भेटतात. या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं याचं समाधान मिळतं.

शिक्षकी पेशा हा उतारवयातही आनंद देणारा असतो. विद्यार्थ्यांच्या आठवणी, प्रसंग हा निवृत्तीनंतरच्या काळातला विरंगुळा ठरतो. कोठेही जा, तुमचे जुने विद्यार्थी भेटतात. या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलं याचं समाधान मिळतं.

शिक्षण संपले आणि अवघ्या तेविसाव्या वर्षी अध्यापक म्हणून वर्गात गेलो. तेव्हापासून पुढे जवळ जवळ पन्नास वर्षे मी वर्गात आणि वर्गाबाहेरदेखील विद्यार्थ्यांशी आपुलकीनं संवाद साधला आणि त्यात रमून गेलो. विद्यार्थ्यांना मी माझं दैवत मानलं. माझी जी काही सर्जनशील वृत्ती होती, तिला अनिरुद्ध संचार करायला मला जर कोणी प्रेरणा दिली असेल, तर ती विद्यार्थ्यांनीच. विद्यार्थी तुम्हाला सतत नवं शिकायची प्रेरणा देतात. तुमचा अभ्यास थांबत नाही, याला कारण हे विद्यार्थी असतात. या विद्यार्थ्यांबरोबरच्या माझ्या वाटचालीत लक्षात राहावेत असे अनुभव अजूनही पुन्हा मनात येतात.

वर्गाइतकेच वर्गाबाहेरही माझे विद्यार्थ्यांशी नाते होते. अनुत्तीर्ण झालेल्या जमेल तितक्‍या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मी त्यांची सहानुभूतीनं चौकशी करीत असे. ते नेमके कशामुळे मागे पडले याची चर्चा करीत असे. साहजिकच त्यांच्या चुका त्यांनाच लक्षात येत. त्या ते सुधारत. तसेच आपले प्राध्यापक आपली घरी येऊन चौकशी करतात, याचे त्यांना काही वेगळेच वाटे. त्यामुळं त्यांच्या मनात आत्मविश्‍वास निर्माण होऊन ते जिद्दीनं अभ्यास करीत आणि उत्तीर्ण होत.

विद्यापीठाशी संबंधित काही समित्यांवर मी काम करीत होतो. त्या वेळचा एक प्रसंग. काही विद्यार्थी विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये कॉपी करतात आणि पकडले जातात. त्यांना बोलावून शिक्षा करण्याचं काम एक सदस्य समिती म्हणून मला करावं लागत असे. परीक्षा विभागातील उपसचिव मदतीला असत. एकदा मी पाहिलं, की जवळ जवळ पंधरा विद्यार्थी रांगेत उभे आहेत. त्यांना शिक्षा तर करायची आहे. पण त्या सगळ्यांना एकत्र बोलावून मी त्यांच्याबरोबर बसलो आणि त्यांना समुपदेशन केलं. मनापासून बोललो. त्यांना पश्‍चात्ताप झाल्यासारखं वाटलं. विशेष म्हणजे सर्वांनी स्वतंत्रपणे कागदावर लिहून आपला पश्‍चात्ताप व्यक्त केला आणि माफी मागितली. त्यांना नेहमीप्रमाणं पाचशे रुपयांचा दंड भरायला सांगितला. हे विद्यार्थी त्या वेळी चुकले, पण त्यांनी पुढे खूप चांगले स्थान मिळवले. विशेष म्हणजे यातील काही विद्यार्थी, काही मोठे झाल्यावरही, माझ्याशी आपुलकीनं बोलायला येत.

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. मी त्या वेळी महाविद्यालयात उपप्राचार्य होतो. माझ्या एका विद्यार्थ्याचा प्रेमभंग झाला आणि त्याची प्रेयसी दुसऱ्याबरोबर निघून गेली, म्हणून तिच्या घरी जाऊन त्यानं तिच्यावर चार गोळ्या झाडून तिचा खून केला. त्याचे वडील मुंबईत फार मोठ्या पदावर पोलिस अधिकारी होते. त्यामुळं त्याला घरात असलेली बंदूक सहज मिळाली होती. पुढे त्याला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तो मुलगा अभ्यासात बऱ्यापैकी हुशार होता. त्याला विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. पण अभ्यासातल्या तीन विषयांमध्ये त्याला मार्गदर्शन हवं होतं. मी त्याला शिकवावं असा त्याचा आग्रह होता. मी येरवडा तुरुंगात जाऊन शिकवायला तयार आहे का, असं मला विचारण्यात आलं. मी आठवडाभर तुरुंगात जाऊन त्याला मार्गदर्शन केलं. पण ही बातमी होऊन बसली. त्या वेळी लोकप्रिय असलेल्या मुंबईच्या "ब्लिट्‌झ' या साप्ताहिकामध्ये माझं पानभर कौतुक झालं. पुढे तो चांगल्या वागण्यामुळं तुरुंगातून लवकर सुटला आणि त्याच्या वडिलांनी त्याला अमेरिकेत कायम राहण्याची सोय केली. पुढे तो अमेरिकेत एका कंपनीत मोठ्या पदावर काम करू लागला. पण विशेष म्हणजे तो अमेरिकेतून भारतात आला की मला भेटायला मुद्दाम येत असे आणि आम्ही दोघंही अशा भेटीच्या वेळी गहिवरून जात होतो.

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविण्याचं पुण्य शिक्षकाला मिळू शकतं. गंमत म्हणजे मी वयाच्या तेविसाव्या वर्षी महाविद्यालयात अध्यापनाचं काम सुरू केलं. त्या वेळी सर्वांत वरच्या वर्गात असलेले विद्यार्थी माझ्यापेक्षा फक्त चार किंवा पाच वर्षांनी लहान होते. पुढे हे सगळे विद्यार्थी योगायोगानं आपापल्या क्षेत्रात मोठे झाले. ते ऐंशी वर्षांचे किंवा त्याहूनही मोठे झाले. त्यांनी त्यांचा एक मेळावा भरवला होता. माझं भाग्य म्हणजे या सगळ्या वयस्कर विद्यार्थ्यांनी त्यांचा पूर्वीचा शिक्षक म्हणून मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. माझे दोन विद्यार्थी राष्ट्रीयीकृत बॅंकांचे चेअरमन झाले. एमबीएच्या पहिल्या तुकडीमधला एक विद्यार्थी राज्यात मुख्य सचिव झाला. त्यांना माझी आठवण येते हे पाहून शिक्षक झाल्याबद्दल मला धन्यता वाटते. आता या माझ्या अति उतारवयात प्रेमळ विद्यार्थ्यांच्या आठवणी हाच माझा विरंगुळा आहे. विद्यार्थ्यांमुळं माझं जीवन सार्थकी लागलं आणि म्हणून आयुष्य समृद्ध झालं याचं मला समाधान आहे.

Web Title: dr p c shejwalkar write article in muktapeeth