मोद मनाला मोहवितो

- डॉ. राजश्री महाजनी 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

या पार्श्‍वभूमीवर कवी कुसुमाग्रजांच्या "कणा' कवितेतील आशादायी विचार मोलाचे वाटतात. "पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा', हा उदात्त विचार देणारी ही अलौकिक उंचीची कविता नैराश्‍य दूर करून आनंदगाणे गुणगुणायला लावते.

मनाला मोहवणाऱ्या, सुखावणाऱ्या निसर्ग दृश्‍यांपासून एखाद्या गीतातील लय-ठेका-सुरांची आस, शिल्पकृती, रंगावली अशा नानाविविधतेचा आनंद हा ज्याला जसा जमेल तसा त्याने घ्यायला हवा... 

जीवन हे सुखदुःखाने भरलेले आहे. कधी ऊन, तर कधी सावली या अवस्थांप्रमाणे सुख आणि दुःख मानवी जीवनात भरलेले आहेच. फक्त ते समजून घेण्याची दृष्टी महत्त्वाची आहे. ती असेल त्याप्रमाणे आनंद मिळवणे शक्‍य आहे. कधी सुखाचे, तर कधी दुःखाचे पारडे जड असते. सुखामुळे हुरळून जायचे नाही, तर दुःखामुळे, निराशेने कोसळूनही जायचे नाही. संतुलित जीवनामुळेच आशादायी मार्ग सुचू शकतो. 

सुख पाहता जवाएवढे, दुःख पर्वताएवढे या अभंगानुसार सुख हे सीमित आणि दुःख अमर्याद आहे. म्हणून आनंद ही गोष्ट समजून घेण्यावर, मानण्यावर आहे. कविवर्य ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांत "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे' हे लक्षात घेतले, तर सकारात्मक बदल होऊ शकतात. सुखामागून दुःख आणि परत सुख ही साखळी चालूच राहणार आहे. म्हणूनच जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. 
संसार करताना पती-पत्नीवर मोठी जबाबदारी असते. संसारासाठी अडीअडचणी, कष्ट करून मुलांना वाढवणे आणि चांगले संस्कार करून उत्तम नागरिक घडवणे, हे त्यांचे आद्य कर्तव्य होय. अशावेळी दोघांनी जबाबदाऱ्यांचा बाऊ न करता त्या वाटून घेतल्या आणि एकमेकांना समजून घेऊन आणि वेळेला कर्तव्यतत्परता दाखवून तशी कृती केली, तर कष्टाचे ओझे न होता त्यातील आनंदाची जाणीव ठळक होईल. 

माणूस हा समाजप्रिय असल्याने समाजात राहणे, सामाजिक भान ठेवून जगणे याचाही आनंद घेणारे अनेक जण आपल्याला दिसतात. समाजातील उपेक्षित, वंचित वा पीडित घटकांसाठी काम करणारे बाबा आमटे, मदर तेरेसा अशी अनेक माणसे ही केवळ दुसऱ्यांसाठीच जगण्यात आनंद मानतात. "सेवेसाठी जन्म आपुला' म्हणून दुसऱ्यांचे जीवन आनंदी करून स्वतःचे जीवन उजळवतात आणि आनंदी राहतात. समाजात अशी दीपस्तंभासारखी अनेक माणसे प्रेरक ठरतात. आनंदी जीवनाचा पाया रचणारी ही माणसे पाहिली, की आपल्या जीवनात येणारे निराशेचे ढग दूर व्हायला नक्कीच मदत होते. आनंदी माणसाप्रमाणे जगणं फार थोड्यांनाच जमतं. त्याऐवजी दुःखी माणसेच अनेक आढळतात. हे जीवन सुंदर, आनंदी आहे, असे मानणं फार महत्त्वाचं आहे. पेला अर्धाच भरलाय म्हणण्यापेक्षा अर्धा तरी भरलाय ही सकारात्मक बाजू महत्त्वाची आहे. अनेकांना विविध गोष्टींचे दुःख असते; पण ते पचवून आनंद शोधणं ही जीवन जगण्याची कलाच म्हणावी लागेल. अंध व्यक्तीला आयुष्यभर अंधत्वाने जगणे म्हणजे केवढे दुःख असेल; पण जेव्हा त्यातील परावलंबित्व तो दूर सारतो, इतरांच्या मदतीने स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो आपले जीवन आनंदाने जगतो. एखादा गायक, कलाकार, कवी इत्यादी वेगळेपण असणारेही अनेक अंध लोक आपण पाहतो, तेव्हा ते कलेत रममाण होऊन आनंद घेतात आणि दुसऱ्यांनाही आनंद देतात. 

या पार्श्‍वभूमीवर कवी कुसुमाग्रजांच्या "कणा' कवितेतील आशादायी विचार मोलाचे वाटतात. "पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा', हा उदात्त विचार देणारी ही अलौकिक उंचीची कविता नैराश्‍य दूर करून आनंदगाणे गुणगुणायला लावते. निसर्ग आणि त्यातील वैविध्य म्हणजे आकाशनिळाई, पहाटरंग, दवबिंदू, शुभ्रचांदणे, मावळतीचे रंग, सागरगाज, इंद्रधनुष्य, धुवॉंधार किंवा रिमझिम पाऊस, श्रावणधार, रंगीबेरंगी फुले यांचा सुगंध, निरागस मूल असे एक ना अनेक रंग आणि रूपांतली "आनंदक्षण' जगण्याला बळकटी आणतात. मनाला मोहवणाऱ्या, सुखावणाऱ्या निसर्ग दृश्‍यांपासून एखाद्या गीतातील लय-ठेका-सुरांची आस, शिल्पकृती, रंगावली अशा नानाविविधतेचा आनंद हा ज्याला जसा जमेल तसा त्याने घ्यायला हवा. या जीवनात आनंद आणि समृद्धी आहे. त्याचा मनमोकळेपणाने अनुभव घेणे म्हणजे "आनंदाचे डोही आनंद तरंग' उमटल्याशिवाय राहणार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Rajarshi Mahajani article