एक नवी सुरवात...

हरीश सरोदे
शनिवार, 5 जानेवारी 2019

पॅथॉलॉजिस्ट काहीतरी वाईट झाले इतकेच सांगतो. उपचार करीत नाही; पण त्या दिवशी उपचारकर्त्याला भेटवू शकलो...

पॅथॉलॉजिस्ट काहीतरी वाईट झाले इतकेच सांगतो. उपचार करीत नाही; पण त्या दिवशी उपचारकर्त्याला भेटवू शकलो...

सकाळपासून रीघ होती. अशा गडबडीत एक बाई मुलाचा हिमोग्राम करण्यास नमुना देऊन हट्टाने आताच मला भेटायचे म्हणू लागल्या. पस्तिशीच्या बाई अन्‌ दहा वर्षांचा मुलगा. 'अहो सर, त्याला खूपच ताप येतो. दोन आठवडे झाले.'' थोड्या वेळाने त्याची स्लाइड समोर आली. दचकलो. शिकताना घोकलेले विसरत नाही याचा प्रत्यय आला. मोठ्या मोठ्या पांढऱ्या अगणित पेशी लाखाच्या आसपास. कमी प्लेटलेट. परत बघू म्हणून बाजूला ठेवली. दुसऱ्या पाहून घेतल्या. परत लेबल चेक करून स्लाइड बघितली फ्रेश. शंका नव्हतीच, ल्युकेमिया-रक्ताचा पांढऱ्या पेशींचा कर्करोग. एवढ्यात परत निरोप, त्या बाई आल्यात. दोन मिनिटे शांत बसून मी विचारले, 'मुलगा बाहेर आहे का? त्याचे रक्त घ्या व परत स्लाइड बनवा अन्‌ आईला आत पाठवा.''

बाई आत आल्या. 'का परत टोचताय त्याला?'' 'बसा जरा ताई, मी समजावून सांगतो सगळे. तुमचे मिस्टर आहेत का इथेच?'' बाई रडायलाच लागल्या, 'म्हणजे काहीतरी आहेच वाईट.'' 'शांत व्हा. त्यांना बोलवा. रडू नका आणि घाबरू नका. आपण बोलू.'' नवी स्लाइड पुन्हा पाहिली. तेवढ्यात त्यांचे मिस्टर आले. मी अतिशय जपून शब्द वापरत त्यांना शक्‍यता सांगितली. पुढच्या सर्व तपासण्यांशिवाय नक्की सांगता येत नाही आणि त्यात वेळ खूप महत्त्वाचा, हेही सांगितले. मला आमचा एक ओळखीचा कॉलेजमेट आठवला. तो अशा केसेस पाहतो. मी त्याचा पत्ता दिला. आई-वडिलांची अवस्था बघून त्याला फोन केला. सुदैवाने तो भेटला अन्‌ म्हणाला, 'अरे लगेच येतील का? मी राउंड घ्यायला चाललो आहे.'' मी या लोकांना लगेच तिकडे पाठवले. सुमारे तीन आठवड्यांनी सकाळी आई-वडील दोघे मला भेटले. दोघांच्या डोळ्यांत पाणी होते. 'सर वाचला आमचा मुलगा. जो कोणता उपप्रकार होता, तो औषधांना चांगला रिस्पॉन्स्ड झाला अन्‌ मुलगा बरा होतोय. मनापासून धन्यवाद.'' ... त्या तीन जिवांची नवी सुरवात झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harish sarode write article in muktapeeth