जगणं तोलाचं

हिराबाई माणिक कांबळे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

वंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले.

वंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले.

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी राहणे भाग पडले. शिक्षणाची तीव्र इच्छा होती, पण ते शक्‍यच झाले नाही. स्त्रियांना घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडता येत नसे. घरातील सर्व कामे करावी लागत. बालवयातच जास्त कष्ट, हालअपेष्टा सहन करायला लागल्या. मी अशिक्षित राहिले, पण मुलांना चांगले शिक्षण द्यायचे, असा निर्धार केला. जीवनात प्रचंड संघर्ष केला. अर्धपोटी राहिले. हातातोंडाची गाठ पडायची असेल तर स्वतः कमावणे आवश्‍यक होते. मी अनेक घरांत स्वयंपाकाची कामे स्वीकारली. पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराला स्वतःला वाहून घेतले. सर्व मुला-मुलींना चांगले शिक्षण दिले व त्यांच्या पायावर त्यांना उभे केले. पती नोकरीला होते. राष्ट्रसेवा दलामध्ये कार्यरत होते. पूर्वी आम्ही नारायण पेठेमध्ये गरूड गणपतीजवळ एकत्र कुटुंबात राहात होतो. पानशेतच्या पुरात घराचे खूप नुकसान झाले; पण हिमतीने पुन्हा घर उभे केले. वस्तीतील लहान मुलांना त्यांचे आई-वडील कामाला गेले की त्यांना सांभाळणे, दूध-भात-बिस्किटे त्यांना देणे, आदी कामे अनेक वर्षे केली. कुठल्याही प्रकारची देणगी किंवा पैसे घेतले नाहीत. केवळ समाजसेवा, आपुलकी या नात्याने हे ऋणानुबंध जपले. वस्तीतील महिलांना बचतीचे महत्त्व पटवून दिले. कित्येक वर्षे पंढरपूरची पायी वारी केली. मी बऱ्याच संस्थांशी संबंधित आहे. सावली चॅरिटेबल ट्रस्ट, लक्ष्मीनगर-पर्वतीतर्फे आम्ही दरवर्षी विविध ठिकाणी जाऊन आदिवासींना कपडे, खाऊ, खेळणी, तसेच अंध, अपंगांना, पोलिसांना रक्षाबंधन, भाऊबीज करतो. सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते "रणरागिणी' पुरस्कार मिळाला. समाजाने विविध पुरस्कार देऊन माझ्या कार्याचा गौरव केला. त्यामुळे नवीन कार्य करण्यास नक्कीच हुरूप येतो. पुरस्काराच्या मानधनात यथाशक्ती रक्कम घालून समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठीच्या उपक्रमांना देण्यात मला आनंद मिळतो. समाजाशी जुळलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट करण्याचा वसा मी सोडणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hirabai kamble write article in muktapeeth