एक कप चहा

कल्पना देशपांडे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

 

एखादी साधी कृती. अंधश्रद्धेपोटी केली जाणारी ती साधी कृती थांबवायची आणि ती शक्ती सत्कर्मासाठी उपयोगात आणायची. कृती साधीच, पण तिची दिशा बदलली की तिची शक्ती खूप वाढते. एखाद्याची भाग्यरेखा उजळण्याइतकी...

 

 

एखादी साधी कृती. अंधश्रद्धेपोटी केली जाणारी ती साधी कृती थांबवायची आणि ती शक्ती सत्कर्मासाठी उपयोगात आणायची. कृती साधीच, पण तिची दिशा बदलली की तिची शक्ती खूप वाढते. एखाद्याची भाग्यरेखा उजळण्याइतकी...

 

रोज सकाळी फिरायला जाताना कोपऱ्यावरील चहाच्या टपरीसमोरील दृश्‍य सुषमाला अस्वस्थ करत होते. तिने ठरवलेच होते. ती त्या टपरीसमोर थांबली आणि त्या इसमाला म्हणाली, ""तुम्ही रोज सकाळी तुमच्या या दुकानाच्या समोर चहा ओतता, त्यामुळे त्या चहावरूनच रोज लोक ये-जा करतात आणि रस्ता घाण होतो. तुम्ही चहा रस्त्यावर ओतू नका.'' त्यावर तो इसम काहीच बोलला नाही. पण त्याने रस्त्यावर चहा ओतणेही थांबवले नाही.

आज मात्र ती घरातून ठरवून निघाली. ती त्या चहावाल्याला म्हणाली, ""तुम्ही रोज सकाळी चहा रस्त्यावर ओतू नका. रस्त्यावर घाण होण्याबरोबरच अन्नाचा अपमानही होतोय.'' त्या दिवशी तो काही बोलला नव्हता. मात्र आता म्हणाला, ""ओ ताई, आमची ही पद्धतच हाय, तुम्हाला काय करायचे ते करा.'' यावर सुषमा म्हणाली, ""मी काय करणार हो; पण तुम्ही हा एक कप चहा रोज सकाळी रस्त्यावर का ओतता, हे मला जरा सांगता का!'' यावर तो म्हणाला, ""ओ ताई, रस्त्यावर असा हा चहा ओतला म्हणजे आमच्या धंद्याची बरकत होती. म्हणून आम्ही सकाळी दुकान उघडलं, की गिऱ्हाईक सुरू व्हायच्या आधी आम्ही जमिनीला पहिलं दान देतो.'' यावर सुषमा म्हणाली, ""अहो असे जमिनीला दान देण्यापेक्षा एखाद्या गरिबाला सकाळी एक कप चहा दिलात तर तो तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल.'' आता मात्र तो चिडला, ""ओ ताई, सकाळी सकाळी धंद्याच्या टायमाला मला शिकवू नका हां.''

सुषमा आपल्या मुलाकडे अमेरिकेला जाऊन आली. सकाळी फिरताना ती कोपऱ्यावर आली आणि तिच्या लक्षात आले. पूर्वीच्या चहाच्या टपरीच्या जागी आता छानसे हॉटेल उभे होते. चार-पाच दिवसानंतर तेथून जात असताना तिला हाक ऐकू आली, ""ताई, ओ ताई...'' हाका मारणारा तिच्यामागे पळत येत होता. ""ताई मला ओळखलंत! मी चहाचा टपरीवाला.'' नीट पाहिल्यानंतर सुषमाला ओळख पटली. ""ताई, अहो हे माझेच हॉटेल. जरा पाच मिनीट चला की माझ्या हॉटेलमध्ये. मी तुमची खूप वाट बघत होतो किती दिवसापासून.'' त्या माणसाने इतका आग्रह केला की तिला त्या हॉटेलमध्ये जावेच लागले.

तो सुषमाला सांगू लागला, ""ताई, तुम्ही पाच-सहा महिन्यापूर्वी मला रस्त्यावर चहा ओतू नका म्हणून सांगत होता. तेव्हा मला राग आला होता. तुमचे या रस्त्याला येणे बंद झाले. पण माझे सकाळी एक कप चहा ओतणे चालूच होते. एक दिवस मी असाच चहा ओतत होतो आणि एक म्हातारा रस्त्याच्या पलीकडून त्या चहाकडे टक लावून बघत होता. मला तुमची एकदम आठवण झाली. मी त्या म्हाताऱ्याला जवळ बोलावले. त्याला तो चहा पाजला. तो खूप खुशीत दिसला. पुढे बरेच दिवस तो म्हातारा रोज सकाळी त्याच वेळी रस्त्यावर लांब उभा राहायचा. कधी चहा मागायचा नाही. पण त्याचे लक्ष मी चहा ओततोय का, याकडे आशाळभूतपणे असायचे. त्याची नजर मला सांगायची. या चहाची गरज त्याला आहे. मग रोज तो माझ्या हॉटेलचा एक कप पहिला चहा रस्त्यावर ओतून द्यायच्या ऐवजी त्याला देऊ लागलो. तो माणूस कुठे राहतो, कुठून आला आणि दिवसभर नंतर कुठे जातो, हे काहीच कळत नव्हते. पण माणूस तसा भल्या घरचा वाटत होता. कधी स्वतःहून त्याने चहा मागितला नाही.''

""एक दिवस मी टपरीचे फळकूट उघडत होतो. तेव्हा एक गाडी समोर थांबली. त्यातून एक माणूस हातातला पेपर मला दाखवत म्हणाला, "यांना तुम्ही ओळखता का!' म्हणलं, हां मी रोज ह्यास्नी सकाळी चहा पाजतो. तो माणूस सांगायला लागला, "अहो, ते माझे वडील आहेत.' काही महिन्यांपूर्वी ते हरवले. मी खूप शोध घेतला त्यांचा. पेपरमध्ये जाहिरात दिली आणि काल मला एका माणसाचा फोन आला. त्यांनी फक्त सकाळी तुमच्या टपरीच्या इथे ते दिसतात असे सांगितले.

तेवढ्यात म्हाताराबुवा चहासाठी आलेच. मुलांनी त्यांना मिठी मारली. पण स्मृतिभ्रंश झाल्याने त्यांना काहीच कळले नाही. म्हाताराबुवांच्या मुलाने "तुमच्या चहामुळे माझे वडील मला पुन्हा मिळाले' म्हणत माझे आभार मानले. त्यांनी बक्षीस म्हणून मला हे छोटे हॉटेल काढून दिले. ताई, तवापासून मी तुम्हाला हुडकतोय. तुम्ही म्हणालात, ते बरोबर होते. मी तो एक कप चहा रस्त्यावर ओतण्यापेक्षा एका गरजूला तो पाजला, त्याने मला आशीर्वाद दिले आणि माझ्या धंद्याची एवढी मोठी बरकत झाली.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalpana deshpande write article in muktapeeth