शक्ती संचारली

माधुरी देशपांडे
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

माणसाजवळ इच्छाशक्ती असली की, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होतात.

माणसाजवळ इच्छाशक्ती असली की, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टीही सहजसाध्य होतात.

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तो माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठू शकतो. श्रद्धासबुरी मात्र त्याच्याजवळ पाहिजे. नवरात्राच्या अगोदर माझा मोठा मुलगा, सूनबाई आणि तिची आई यांच्यासह माहुरला श्री रेणुका मातेच्या दर्शनाला गेले. मी पंचाहत्तरीची. त्यातून कर्करोगाने ग्रस्त. रक्तदाबाचा त्रासही आहेच. म्हणून मी मुलाला व सुनेला म्हणाले, ""अरे, माझी ही अशी प्रकृती, तुम्ही जाऊन या. माझा रेणुका मातेला नमस्कार सांगा. मी येणार म्हणजे तुम्हा दोघांना त्रास होणार.'' परंतु हो-ना करता करता मी निघाले. गाडीत सुनेने, मुलाने मला चांगले सांभाळले.

औषधपाणी, खाणेपिणे वेळेवर होत होते. आम्ही दुपारी शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो. दर्शन करून व्यवस्थित आले; परंतु मला एकाएकी खूपच त्रास व्हावयास लागला. पाच मिनिटांच्या अंतरावर निवासस्थान होते; पण माझा उजवा पाय अगदी उचलत नव्हता. शेवटी रिक्षा करून मला उचलून रिक्षात बसविले.
दुसऱ्या दिवशी माहूरला जायचे होते. सगळ्यांना माझी काळजी; परंतु सकाळी मला थोडे बरे वाटावयास लागले. गाडीने माहूरचा घाट पार केला. माहूरगाव आले. मला हुशारी वाटू लागली. मुलगा म्हणाला, ""आई, तू डोलीने गडावर जा. आम्ही चालत चालत येतोच.'' परंतु रेणुका मातेच्या गडाची पहिली पायरी पाहिली व माझ्या अंगात एकदम शक्ती निर्माण झाली. मी म्हणाले, ""नको, मीपण गड चढून रेणुका मातेचे दर्शन घेणार.'' मी गड चढून गेले. दोन वेळा मातेचे दर्शन घेतले. विडा भरवला. मातेची दृष्ट काढली. सर्वांबरोबर गड उतरले. मला अजिबात दम लागला नाही. कोठे मधे बसावे लागले नाही. पाणी प्यावे लागले नाही. मी एका दमात रेणुका मातेचा गड चढले व उतरले; पण काही त्रास झाला नाही. म्हणून मी म्हणते जिद्द, चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, माणसाजवळ पाहिजे.

Web Title: madhuri deshpande write article in muktapeeth