देव पाहतो, धावतो

मालती धोडपकर
गुरुवार, 13 एप्रिल 2017

तीन मुलांसह मी काश्‍मीरला जायला निघाले होते. रेल्वे रिझर्व्हेशनही नव्हते. दिल्लीला तर पूर्ण डबाच मोकळा झालेला. रेल्वेच्या गार्डनेच वाटेत धीर दिला आणि आम्ही एकदाचे पोचलो.

तीन मुलांसह मी काश्‍मीरला जायला निघाले होते. रेल्वे रिझर्व्हेशनही नव्हते. दिल्लीला तर पूर्ण डबाच मोकळा झालेला. रेल्वेच्या गार्डनेच वाटेत धीर दिला आणि आम्ही एकदाचे पोचलो.

गोष्ट आहे 1975 मधली. एवढ्या वर्षात सारे काही झपाट्याने बदलले आहे; पण इतकी वर्षे लोटली तरी ती जुनी गोष्ट अजूनही जशीच्या तशी डोळ्यांपुढे येते. माझे पती तेव्हा स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये "इन्स्पेक्‍शन ड्युटी'वर होते. त्यामुळे त्यांची सतत फिरती असे. म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी मी मुलांसह मिरजेला राहत होते. मुलांच्या शाळेला सुटी लागली की, हे जिथे असतील तिथे मुलांना घेऊन जायची. त्या वर्षी मुलांच्या सुटीच्या काळातच हे नेमके काश्‍मीरला होते. त्या वेळी काश्‍मीर आतासारखे अशांत नव्हते. चित्रपटात काश्‍मीर पाहायला मिळत असे. तिथेच आपण जायचे म्हणून मुले आणि मीही आनंदून गेलो होतो. पण त्याचबरोबर इतक्‍या लांब जायचे तर रेल्वेचे रिझर्व्हेशन? डोंबिवलीला माझा भाऊ राहत होता. तिथे मी मुलांना घेऊन गेले. मी व माझी वहिनी दोघी व्हीटीला रिझर्व्हेशन मिळेल का बघायला गेलो. तुफान गर्दी. खिडकीपर्यंत जाणेही मुश्‍कील. वहिनीचे मामा तिथे स्टेशनवर काम करत होते, त्यांना भेटून येऊ म्हणून त्यांच्याकडे गेलो. आतून तिकीट देणारे काही लोक असतात, त्यातील एकाला त्यांनी सांगितले. आम्ही त्याच्याकडे पैसे दिले. "थोडे जास्त द्या' म्हणाला. त्याने दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी गेलो तर तो म्हणाला, "आणखी पैसे मागत आहेत.' आमच्यापुढे काही उपाय नव्हता. आम्हाला जायचे होतेच, म्हणून दिले आणखी पैसे. तो म्हणाला, "पाच मे या दिवशी गाडीच्या वेळेला सामान घेऊन या, तिकीट देतो.' मी सर्व सामान, तीनही मुलांना घेऊन स्टेशनवर गेले. माझा भाऊ होता बरोबर. त्या माणसाला शोधले तर तो गायब. गाडीची वेळ जवळ येत चालली. त्या माणसाची चौकशी केली, तर दोन दिवसांपूर्वी त्याला पकडले होते. आता आला परत प्रश्‍न. पैसेही गेले आणि हाती तिकीटही नाही. भाऊ म्हणाला, "तुम्हाला तिकिटे काढून देतो, बसवून देतो,' जम्मूतावी स्पेशल जादा गाडी नुकतीच सुरू झाली होती. भावाने आम्हाला महिलांच्या डब्यात बसवून दिले. प्रवास तर सुरू झाला. "बसवल्याबरोबर एक्‍स्प्रेस तार करा' असा ह्यांचा निरोप होता. त्याप्रमाणे भावाने तार केली. त्या वेळी श्रीनगर-जम्मू बससेवा दिवसाच असायची. त्यामुळे तार सकाळी मिळाली तर हे लगेच आम्हाला घ्यायला निघणार होते. ते वेळेत पोचले नाही तर आम्ही वेटिंग रूममध्ये थांबणार होतो.

दिल्ली आले. भराभरा सर्व महिला उतरल्या. उतरता उतरता एक पंजाबी बाई म्हणाली, ""बहेनजी, आप कहॉं जा रही हो, बच्चोंको लेकर अकेली मत बैठना, आगे का रास्ता बहुत खतरनाक है।'' माझी मोठी मुलगी बारा वर्षांची, दुसरी अकरा वर्षांची आणि मुलगा सात वर्षांचा. दुसऱ्या मुलीला व एक बॅग घेऊन मी उतरले. शेजारच्याच डब्यात तिला बॅगेवर नेऊन बसवले. कारण बसायला सीट नव्हतीच. पुन्हा डब्याशी आले. मोठीला व मुलाला आणि उरलेले सामान घ्यायला. तेवढ्यात एक सरदारजी आला. आपली ऐंशी-ब्याऐंशी वर्षाची आई व पंधरा-सोळा वर्षांच्या दोन मुलींना घेऊन आणि म्हणाला, ""आप इधरही बैठना, इनको आपके साथ ले जाना.'' पुन्हा पुढच्या डब्यापाशी आले. मुलीला व बॅग घेऊन परतले. सोबत मिळाली; पण जबाबदारी तितकीच. गाडी सुरू झाली पुढच्या प्रवासाला.

जादाची गाडी सोडली असल्या कारणाने नेहमीच्या गाड्या यायच्या वेळेला आमच्या गाडीला साइडिंगला उभी करायचे कुठेही. अशीची एकदा रात्रीची गाडी थांबली असताना गार्ड दाराशी आला, म्हणाला, "खिडकी की काच मत खोलना, दरवाजा मत खोलना,' मी त्याला दाखवले, कितीतरी खिडक्‍यांना काचाच नव्हत्या. पूर्वी आडवे बारपण नसत, दरवाज्याला पण काच नव्हती. मग तो प्रत्येक वेळेला गाडी उभी राहिली, की दरवाज्याबाहेर येऊन उभा राहायचा. आमच्या डब्यामागेच गार्डचा डबा होता. स्टेशनवर तर डबा फलाटालाही लागायचा नाही. मग तो पाणी आणून दे, चहा आणून दे असे करायचा. खऱ्या अर्थाने "गार्ड' झाला आमचा.

गाडी जम्मूला पोचायला उशीर झाला. त्यामुळे हे घ्यायला स्टेशनवर आले होते. त्यांना पाहताच आणि गाडी हळू झाली तशी मुलाने खिडकीतूनच फलाटावर उडी मारली. त्यांना पाहून मला हायसे झाले एकदम. प्रत्यक्षात देव आहे की नाही कोण जाणे; पण प्रत्येकाच्या अंतःकरणात देवाचे अस्तित्व असते याचा प्रत्यय आला. गार्डच्या रूपात परमेश्वर धावून आला. त्याने मदत केली नसती तर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malati dhodapkar write article in muktapeeth