ओळख जी अ-क्षर

मानसी चौथाई-जोशी
मंगळवार, 29 जानेवारी 2019

मनाच्या पाटीवर अक्षरांमधून उमटलेली ओळख कधी पुसली जात नाही, जणू अक्षरशः ती अ-क्षर असते.

मनाच्या पाटीवर अक्षरांमधून उमटलेली ओळख कधी पुसली जात नाही, जणू अक्षरशः ती अ-क्षर असते.

थालीपिठाची भाजणी शोधत होते. सगळी पिठे एकसारखी दिसायला लागली. तेवढ्यात एक छोटीशी कागदाची चिठ्ठी एका पिशवीतून डोकावू लागली, बघते तर आईच्या हस्ताक्षरातील दोन शब्दांची चिठ्ठी "थालीपीठ भाजणी'. त्या दोन शब्दांनी आई जवळ असल्यासारखी भासली. त्या अक्षरांची ओळख खूप जुनी, आपलीशी वाटली. आपले एखादे जवळचे माणूस काही कारणांनी आपल्यापासून दूर असते, तेव्हा आपण त्याची आठवण किंवा एखादी वस्तू जवळ बाळगतो, तीच गोष्ट हस्ताक्षराची.... अक्षर ही त्या व्यक्तीची ओळख. आता अगदी लहानपणीचेच उदाहरण, आईच्या हस्ताक्षरात लिहून घेतलेली अनेक विषयांवरची भाषणे आठवतात. भाषण एकदा पाठ झाले की डोळे मिटून अगदी स्वल्पविरामांसकट डोळ्यासमोर उभे राहायचे. बाबांनी त्यांच्या खास शैलीत सुबक अक्षरात वहीच्या पहिल्या पानावर लिहिलेले आपले नाव, तुकडी असो किंवा अगदी रोजच्या व्यवहारातील किराणा मालाची यादी, टेलिफोनची डायरी. प्रत्येकाचे पान त्या व्यक्तीच्या अक्षराने सवयीचे होऊन जायचे. आजोबांनी चष्मा वर करून तिरकस अक्षरात लिहिलेले फोन नंबर आणि नावांची यादी अजूनही लक्षात आहे. आजोळी सुटीसाठी गेल्यावर आजी पेटीचा रियाज करून देताना वहीत राग लिहून द्यायची, आजही त्या वहीतल्या गाण्यांवरून नजर फिरवताना आजी आठवते, तिच्या विणकामाच्या वहीतल्या मोजक्‍याच, पण सुंदर अक्षरातून तिची उब जाणवते.
तुम्ही कधी लहानपणी तुमच्या दोस्तांना पत्र लिहून पाहिलेय, त्या शब्दांची, अक्षरांची मजा काही वर्षांनी जेव्हा ते पत्र पुन्हा हाताशी येते ना, ती अनुभवण्यासारखीच. त्या हस्ताक्षरांतून आपले माणूस आठवणींचा फेर धरून डोळ्यासमोर उभे राहाते. गोष्टीच्या पुस्तकात पहिल्या पानावरची आवडत्या लेखकाची सही असो किंवा आपल्या जुन्या डायरीतल्या लिखाणातील कविता, ती हस्ताक्षराची मजा सध्याच्या ई-मेल आणि व्हाट्‌स ऍपच्या जमान्यात लोप पावत चालली आहे. कधी पाहिलेय... जुन्या अल्बममधील छायाचित्रांसारखे अनेक वर्षांनी स्वतःचे अक्षर जवळून पारखून? बघा, कदाचित स्वतःची ओळख पटेल नव्याने अन्‌ गवसेल आपल्यातला "मी'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manasi chauthai joshi write article in muktapeeth