डॉक्‍टर हे "देवदूत'च!

डॉ. धर्मेंद्र पाटील
मंगळवार, 30 जून 2020

आजही गावखेड्यांत डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त... 

अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा केला जातो.

एक जुलैला का साजरा केला जातो डॉक्‍टर्स डे? 
एक जुलै हा भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस. त्यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून एक जुलै हा दिवस "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा केला जातो. 1991 मध्ये केंद्र सरकारने या दिवशी "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा करावा, असा निर्णय घेत सुरवात केली. चार फेब्रुवारी 1961 ला डॉ. बिधानचंद्र रॉय यांना भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान "भारतरत्न' बहाल करण्यात आला आहे. 

डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे जीवनचरित्र 
डॉ. रॉय यांचा जन्म एक जुलै 1882 ला पटना येथे झाला. फिजिशियन डॉ. बिधानचंद्र रॉय हे पश्‍चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्यामुळे डॉ. रॉय यांना "पश्‍चिम बंगालचे आर्किटेक्‍ट' असेही म्हणतात. डॉ. रॉय यांचे शिक्षण कलकत्त्यामध्ये झाले. "एमआरसीपी' आणि "एफआरसीएस'ची डिग्री लंडनमधून घेतली आहे. 1911 पासून त्यांनी भारतात वैद्यकीय सेवा देण्यास सुरवात केली. 

सध्या भारतातील सर्वच डॉक्‍टर "कोविड-19' अर्थात "कोरोना'विरोधात लढा देत आहेत. आपला जीव धोक्‍यात घालून रुग्णांचे प्राण वाचवीत आहेत. "लॉकडाउन'च्या सुरवातीच्या काळातही आपण सर्वांनी थाळी, टाळी वाजवून या डॉक्‍टरांच्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले आहे. तेव्हा आजच्या "डॉक्‍टर्स डे'निमित्त सर्व डॉक्‍टरांना अनंत शुभेच्छा! 

(लेखक जळगाव येथील नेत्ररोगतज्ज्ञ आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article jalgaon The doctor is an "angel"