माणसा माणसा... कधी व्हशीन मानूस...! 

प्रा. डॉ. सत्यजित साळवे, जळगाव 
Sunday, 21 June 2020

रविवारी (21 जून) "फादर्स डे'... जन्म देणाऱ्या बापाचा गौरव करण्याचा दिवस... बाप हा माणूस आहे... माणूसच माणसाचा बाप आहे... अन्‌ माणूस माणसाचा "गॉडफादर'सुद्धा... त्यानिमित्त...! 

जनजीवनवादी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या गाण्यांनी उभ्या मराठीजनाच्या मनावर आणि ओठांवर गारूड केले आहे. कोणत्याही शाळेची पायरी न चढलेल्या अशिक्षित; परंतु प्रचंड ज्ञानी आणि व्यवहारी असणाऱ्या या बाईनं जीवनाचे अगाध तत्त्वज्ञान साध्या- सोप्या भाषेत सांगितले आहे. एका गाण्यात त्या म्हणतात... 

मानसा मानसा 
कधी व्हशीन मानूस 
लोभासाठी झाला 
मानसाचा रे कानूस...! 

पृथ्वीवरचा सर्वांत हुशार आणि बुद्धिमान प्राणी मानव आहे. त्याला बोलता येते, वाचता येते आणि विचारही करता येतो. त्याच्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर तो हवे ते करू शकतो, असे आपण म्हणतो. पण, तोच माणूस आज माणसाच्या जिवावर उठला आहे, हे सत्य आपण नाकारू शकत नाही. माणूस माणसाची हत्या करतो. माणूसच माणसाला संकटात टाकतो. मीच जगज्जेता आणि मीच सर्वश्रेष्ठ, या मिथ्या अभिमानात माणूसच माणसाला संपवत चालला आहे. यावरून माणसाचा उलटा प्रवास सुरू झाला आहे, याची खात्री देणाऱ्या काही घटना नुकत्याच घडलेल्या आहेत. त्या माणूस म्हणून समजून घेणे काळाची गरज आहे. 

कोरोनाचा फैलाव 
जागतिक पटलावर वर्चस्ववादाच्या स्पर्धेत चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून निसटलेल्या कोरोना विषाणूने आख्खे जग कवेत घेतले आहे. आजमितीला साडेचार लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. निव्वळ महासत्तेच्या जीवघेण्या स्पर्धेत मीच अव्वल, हे भासविण्यासाठी केलेली ही कुरघोडी अखिल मानवाच्या जिवावर उठली आहे. जगातील साऱ्याच देशांना या महामारीला सामोरे जावे लागत आहे. याची किंमत चीनला चुकवावीच लागणार आहे. पण, या काळात सामान्य माणसांचे, मजुरांचे आणि कष्टकऱ्यांचे, तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. ते प्रचंड वेदनादायी, अमानुष असे होते. या लॉकडाउनच्या काळात माणसे एकमेकांपासून दुरावली. एकमेकांकडे शंकेने पाहत जीव मुठीत धरून जगू लागली आहेत. माणूस किती क्षुल्लक आणि नीच आहे, हे या काळाने सिद्ध केले आहे. 

जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू 
जगातले मानवतावादी आणि लोकशाही राष्ट्र असा डंका पिटणाऱ्या अमेरिकेचा सैतानी चेहरा या घटनेने जगासमोर उघड झाला. अत्यंत किरकोळ कारणांनी फ्लॉइडचा जीव घेणाऱ्या पोलिसी अत्याचाराचा नंगानाच साऱ्यांनी पाहिला. फ्लॉइडच्या मानेवर गुडघ्याने दाब देणाऱ्या डेरेकने विश्वातील माणुसकीचाच गळा घोटला. मला श्वास घेता येत नाहीये, जगण्यासाठी गयावया करणाऱ्या फ्लॉइडची या राक्षसांना दया येऊ नये. वर्णभेदाचा एवढा विषारी आणि भयानक चेहरा दुसरा असूच शकत नाही. वर्णाच्या फुटकळ अंहकारातून माणूस माणसाचा जीव घेतो, हे अमानवी आणि अमानुषच आहे. 

"विनायकी'ची हत्या 
केरळ राज्यात "विनायकी' नावाच्या हत्तिणीची निघृण हत्या करण्यात आली. गरोदर असणाऱ्या या हत्तिणीला स्फोटके खाऊ घालून ठार करण्यात आले. निर्दयी ग्रामस्थांनी उघड्या डोळ्यांनी पाहत या घटनेचा आनंद घेतला. कुणीही विरोध केला नाही. समाजमाध्यमांत ही पोस्ट व्हायरल होताच, संपूर्ण देश हळहळला. वन्यजीवांचे रक्षण करणारे मंत्रालय कारवाईसाठी सरसावले. आज ना उद्या यांच्यावर कारवाई होईलही. पण, खरा प्रश्न हा आहे, की या माणसांमध्ये एवढी क्रूरता आणि कौर्य येते कुठून? 

विषमतेचा विषाणू 
एक दिवस कोरोना विषाणू आपण नष्ट करू. पण, ज्या दिवशी जगातील आणि विशेषतः भारतातील विषमतेच्या विषाणूचे उच्चाटन होईल, त्या दिवशी समतामूलक समाजाची निर्मिती झाल्यावाचून राहणार नाही. पण, हे दिवास्वप्न हजारो वर्षांपासून साकार व्हायचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस अरविंद बनसोडे आणि विराज जगताप याला बळी पडत आहेत. ही विषमता आमच्या सर्वांगात भिनली आहे. जात, वर्ग, वर्ण, तर कधी धर्म आणि संप्रदायाचे विखारी रूप घेऊन मानगुटीवर बसलेली आहे. म्हणून खैरलांजी, गुजरात, उन्नान, सोनई, खर्डा यातून ती उचल खाते. खोटी प्रतिष्ठा, जातीचा अहंकार, सनातनी धर्मांधता यांनी दलित, आदिवासी व अल्पसंख्याक, कमजोर आणि वंचितांना, अलक्षितांना लक्ष्य केले आहे. "विनायकी' हत्तिणीच्या हत्येने व्याकूळ झालेली कर्मठ मानसिकता बनसोडे आणि जगताप यांच्या बळींनी जराशीही हळहळली नाही. मुंगीला साखर आणि कुत्र्याला भाकर देणाऱ्या देशात बालकाच्या स्पर्शाने मंदिर बाटले, म्हणून त्याचा जीव घेणारी पिलावळ येथे आहे. विषमतेचा हा विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा महाभयानक आहे, हे वास्तव आपण कसे नाकारणार? 

सुशांतसिंहची आत्महत्या 
काही दिवसांपूर्वी ग्लॅमरच्या दुनियेतून एक धक्कादायक बातमी आली. ऐन उमेदीच्या काळात यश, कीर्ती, पैसा सारेकाही असताना सुशांतसिंह राजपूत नावाच्या तरुण आणि उमद्या अभिनेत्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. लहानशा शहरातून आलेल्या आणि अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना या चमकदार दुनियेत आपले नाव सुशांतने उजळवले होते, तरीही त्याने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले? या गुंत्यांतून काहीच स्पष्ट होत नाही. मोठ्या बॅनर्सच्या चमच्यांनी त्याला या गर्तेत ढकलेले आहे, असे म्हटले जातेय. त्याने स्वतःला संपवले ते चूकच आहे. त्याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. पण, त्याच्या अशा जाण्याने चमकदार पडद्यामागील घनदाट अंधार समोर आला. 

सरणावर जाताना मला 
इतकेच कळले होते... 
मरणाने केली सुटका, 
जगण्याने छळले होते...! 

या सुरेश भट यांच्या गझलेतील शब्द त्याची घालमेल, घुसमट सांगून जातात. 

हिंदी-चिनी भाई भाई 
पुन्हा एकदा चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. गलवान खोऱ्यात भारत- चीन सीमेवर सैन्याच्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले, तर चीनचे 35 जवान मारले गेले. साम्राज्यवाद आणि त्यातून बळावलेल्या वर्चस्ववादात 55 जवान मारले गेले. जवान मारले जातात, हे अर्धसत्य आहे; माणसे मारली जातात, हे पूर्ण सत्य आहे. दोन्ही देशांच्या आपापल्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून ते रात्रंदिन बर्फ ओकणाऱ्या थंडीत पोलादी छाती घेऊन उभे असतात. देशाच्या राजकारणासाठी सैनिकांचे रक्त वापरण्याची नवी रणनीती जगात स्थापित होण्याचा हा दुर्दैवी काळ आहे. युद्धाचे ढग आकाशात जमू लागले, की कुठेतरी निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे, अशी शंका माणसे उपस्थित करू लागली आहेत. माणूस हा सृष्टीची चेतना आहे, हे सत्य उमगल्यावर जग युद्धाची वाट सोडून बुद्धाकडे प्रयाण करेल. 

बुद्ध म्हणतात... 

सब्ब पापस्य अकरणं 
कुसलस्सं उपसंपदा 
सचित्तपरियोदपनं 
एतं बुद्धानं सासनं... 

अमंगल, अकुशल यांचा त्याग करणे जे कुशल आहे, मंगल आहे, त्याचा जीवनात स्वीकार करणे, हाच मानवी कल्याणाचा मार्ग आहे. निर्मनुष्य सृष्टीचा विचार करून बघा, म्हणजे कळेल माणूस किती महत्त्वाचा आहे. 

(लेखक जळगावच्या डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi article jalgaon ...Kadhi Vashi Manus...