esakal | शैक्षणिक वर्ष बदलण्याची गरज!
sakal

बोलून बातमी शोधा

education

ऑगस्ट ते नोव्हेंबर हे पहिले सत्र आणि डिसेंबर ते मार्च हे दुसरे सत्र असेल. दिवाळी, नाताळ आणि इतर सुट्यांचे नियोजन त्या- त्या सत्रांमध्येच करावे. निदान पुढच्या वर्षापासून शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करावे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्याची वाटचाल अधिक चांगली करता येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. चालू वर्षापासूनही हे नियोजन होऊ शकते... 

शैक्षणिक वर्ष बदलण्याची गरज!

sakal_logo
By
प्रा. पी. डी. दलाल

युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देशांत शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू होते. आपल्याकडे मात्र प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे सर्व जवळपास जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि पुढील वर्षाच्या मेअखेरीस किंवा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व निकाल लागतात. याला अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम मात्र अपवाद असतील. 

शेतीकामांत मदत करू शकली तर... 
भारतासारख्या देशात, विशेषतः महाराष्ट्र या कृषिप्रधान राज्यात मे आणि जूनमध्ये शेतीची बरीच कामे केली जातात. उदाहरणार्थ- जमिनीवरील तण काढून नांगरणी करणे, शेततळी व इतर जलसंधारणाची कामे, नाल्यातील गाळ काढून त्याचा खत म्हणून वापर करणे, तण काढणे, पहिल्या पावसानंतरची पेरणी, कीटकनाशकांची फवारणी आदी कामांसाठी शेतकऱ्यांना मजूर लावावे लागतात. कारण, त्यांची मुले शहरात या दिवसात परीक्षेत वा अभ्यासात व्यस्त असतात. मजुरांना रोजगार द्यावा लागतो. शेतकऱ्यांची मुले जर या दिवसांत शेतीकामात मदत करू शकली, तर हा खर्च काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मेमध्ये सकाळी सात- साडेसात ते साडेअकरा- बारा व सायंकाळी पाच ते सातपर्यंत शेतात काम व दुपारी भोजन व विश्रांती घेता येते. 

शैक्षणिक वर्षाची पुनर्रचना करणे आवश्यक 
माजी कृषिमंत्री शरद पवार बऱ्याचदा असे म्हणतात, की आपल्या विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ तुटलेली आहे. शेतकऱ्यांनी नव्हे; तर इतरही लोकांनी शेतीत लक्ष घातले, तर ते पुन्हा यानिमित्ताने जोडले जातील, तसेच आज शेतीवरील अवलंबून असणारी लोकसंख्या ५० टक्क्यांहून वाढून पूर्वीप्रमाणे ७०- ७५ टक्के होईल. जादा अन्नधान्य व इतर पिकेही निर्यात करू शकतो. महात्मा गांधींची जीवनशिक्षणाची आणि श्रमातून शिक्षणाची संकल्पनासुद्धा साकारली जाऊ शकेल. ज्यांच्या पालकांचे दुसरे व्यवसाय असतील, त्यांना ते मदत करू शकतील. उदाहरणार्थ- दुकानदारांच्या मुलांनी दुकाने कशी चालवावीत, हे शिकू शकतील. आज खेड्यातून शहराकडे जाणारा लोंढा कमी होऊन शहरांच्या पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या सुविधांवरील ताण कमी होईल. याउलट गावातीलच सुशिक्षित तरुण या सुविधा आपल्या गावात कशा आणता येतील, याकडे लक्ष देतील आणि गावांचा विकास होईल. यासाठी शैक्षणिक वर्षाची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. 

फी गरिबांना परवडणारी नाही 
प्राथमिक शिक्षणाची शहरात पालिका किंवा महापालिका, तर खेड्यात जिल्हा परिषद शिक्षण मंडळाची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त काही खासगी शिक्षण संस्था, बालवाड्या प्राथमिक शिक्षण देत असतात. मात्र, त्यांची फी गरिबांना परवडणारी नसते. या सर्व प्राथमिक शाळा जूनपासून सुरू होतात. प्राथमिक शाळा म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणारी सहा ते दहा वर्षांची मुले असतात. वास्तविक, जून- जुलै हे महिने व ऑगस्टचा पहिला पंधरवडा यात पावसाचा जोर असतो. त्यामुळे आज पालकांची होणारी धावपळ पुष्कळ प्रमाणात कमी होऊ शकेल, तसेच ज्या शाळांच्या स्वतःच्या बस असतात, त्याचे भाडे परवडणारे नसल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गातील मुलांना अक्षरशः रिक्षांत कोंबून पाठवावे लागते. 

जीवनशिक्षणाशी निगडित उपक्रम हवा 
शालेय परीक्षा आज फेब्रुवारी- मार्चमध्ये संपतात; त्याचबरोबर सर्व महाविद्यालयीन आणि विद्यापीठस्तरीय परीक्षाही (लेखी आणि प्रात्यक्षिके) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपल्या, तर शेतकऱ्यांची मुले घरी परतून शेतीकामांत मदत करू शकतात. शालेय, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पदवी- पदव्युत्तर शैक्षणिक वर्ष मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच सुरू करावे. म्हणजेच मे, जून आणि जुलै असे तीन महिने मुलांना आणि शिक्षकांना मोकळे मिळतात. जून- जुलैपर्यंत पावसाचा जोर असतो. त्यामुळे पावसाळ्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांचा जाण्याचा बराचसा त्रास वाचू शकतो. यापैकी एक महिना मुले शिक्षकांनी जीवनशिक्षणाशी निगडित कुठलाही उपक्रम पूर्ण करावा. 

‘फिल्ड वर्क’ही तेवढेच महत्त्वाचे 
शिक्षण हे केवळ चार भिंतींत नसून, ‘फिल्ड वर्क’सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त शिक्षकांना आणि प्राध्यापकांनासुद्धा पेपर तपासणीसाठी आणि निकाल लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरदेखील अधिक ताण येणार नाही; त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या प्रवेश प्रक्रियासुद्धा वेळेत सुरू होऊन पूर्ण करता येतील. यामुळे या प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणांवरसुद्धा अधिकचा ताण येणार नाही, तसेच उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, तसेच या वेळेचा सदुपयोग करून आपल्या आवडीच्या कामात सुटी घालविता येईल. श्रमदान शिबिरात भाग घेता येईल. मुलांना आपले कलागुण जोपासता येतील. संगीत, चित्रकला व हस्तकला अशा कला शिकण्यात ज्यांना रस आहे, त्यांना त्या शिकता येतील. ज्यांच्या गावात चांगले वाचनालय आहे, त्यांना वाचनाची आवड जोपासून आपल्या ज्ञानात भर टाकता येईल. शहरातील मुलांना याचा जास्त फायदा होऊ शकतो. मैदानी खेळ आपल्या गावात विद्यार्थी सुरू करू शकतात; जसे- देशी खेळ- खो- खो, कबड्डी आणि परदेशी खेळ- क्रिकेट, बॅडमिंटन हे शिकू शकतील. उन्हाळ्यात दुपारी घरातल्या घरात कॅरम, बुद्धिबळ असे खेळ खेळता येतील. 

घरगुती उद्योग सुरू करू शकतात 
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेशिवाय एक नवीन भाषा प्रत्येक सुटीत शिकावी. नवीन भाषा शिकण्याची संधी मिळू शकेल. त्यासाठी इतर राज्यांत जाऊन यावे. ज्यांना खेळात प्रावीण्य मिळविण्याची इच्छा आहे, ज्यांच्या गावात खेळाची सोय आहे, ते आवडीच्या खेळात प्रावीण्य मिळवू शकतात. एखाद्या खेळात प्रावीण्य मिळविल्यास त्याचा फायदा नोकरीतही होऊ शकतो; त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यही अधिक चांगले होईल. ज्या पर्यटनाचा आणि ट्रेकिंगचा आनंद लुटण्यास वा सुटीचा उपयोग होऊ शकतो. ज्यांची शेती आहे, ते शेतीतील उत्पादनांपासून घरगुती उद्योग सुरू करू शकतात. उदाहरणार्थ- पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात, विशेषतः नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे पीक मोठ्या प्रमाणात येते. ती पॅक करून परदेशात पाठविण्याचे काम करता येऊ शकते. उरलेल्या द्राक्षांचे बेदाणे (मनुका) करण्याचा उद्योग फायदेशीर ठरू शकतो. धुळे, जळगाव जिल्ह्यांत बटाट्याप्रमाणे कच्ची केळी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचे वेफर्स बनविता येतील. कोकणात आंबा पोळी, फणस पोळी, कोकम सरबत, नाचणी व पोह्यांचे पापड किंवा विदर्भात संत्रापासून सरबत व बर्फी आदी गोष्टी तयार करू शकतात. ही उत्पादने निर्यातही होऊ शकतात. 

थोडक्यात, आपल्या भागात पिकणाऱ्या फळाफुलांचा व्यापार करून विद्यार्थी कुटुंबाचे उत्पन्न वाढवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात. यातून विद्यार्थी उद्योजकतेचे प्राथमिक धडे गिरवतील, यात शंका नाही. याशिवाय इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, प्लंबिंग, याशिवाय डिजिटल आणि ऑनलाइन कोर्सेस असे अनेक पर्याय विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे निवडू शकतात. यामुळे त्यांच्यातील रोजगार आणि स्वयंरोजगार कौशल्ये वृद्धिंगत होतील. जी पुढील आयुष्यात त्यांना स्वतंत्र व्यवसायाची संधी देऊ शकतील, तसेच पदव्युत्तर व इतर तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी परदेशात जायचे असल्यास ते शक्य होऊ शकते. 

ऑगस्ट ते नोव्हेंबर हे पहिले सत्र आणि डिसेंबर ते मार्च हे दुसरे सत्र असेल. दिवाळी, नाताळ आणि इतर सुट्यांचे नियोजन त्या- त्या सत्रांमध्येच करावे. अशा प्रकारे, या नाहीतर निदान पुढच्या वर्षापासून शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करावे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची वाटचाल अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. चालू वर्षापासूनही हे नियोजन होऊ शकते. 

(लेखक पुणे विद्यापीठातील वाणिज्य विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, माजी आमदार व चार्टर्ड अकाउंटन्ट आहेत.)