वेळ आली होती; पण...

रवींद्र थोरात
शुक्रवार, 29 जून 2018

 ‘अंगी दिसती काटे, तरी आतुनी रसाळ गोमटे’ हे आपल्याला माहीत असते, तरीही आपण कोणा व्यक्तीविषयी ‘वरलिया रंगा’वरून भलत्यासलत्या कल्पना करून घेतो. मात्र, प्रत्यक्षातील अनुभव खूप वेगळा असतो.

पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत फिरून या, असे आयुक्तांनी सांगितले. त्या वेळेस माझी बहीण अंजना बागडे ही राजस्थानमध्ये अलवर शहरात राहत होती. मी तिच्याकडे जायचे ठरवले. दिल्लीतील प्रसिद्ध कश्‍मिरी गेट बस स्थानकावर पोचलो. दुपारची चारची वेळ होती. एका खासगी बसजवळ जाऊन चौकशी केली. तिकीट देणाऱ्या व्यक्तीने ती बस अलवरला जात असल्याचे सांगितले, म्हणून तिकीट काढून बसमध्ये बसलो. गाडी अलवरला जाणार नव्हती, तर जवळून जाणार होती हे पुढे प्रवासात कळले. 

अलवरकडे जाणाऱ्या तिठ्यावर पावणेअकराला उतरल्यावर मी आजूबाजूला पाहिले, सभोवताली गडद अंधार पडला होता. रस्त्यावर दिवे नव्हते. जास्त रहदारी नसल्याने मधूनच एखादे वाहन येत-जात होते. आजूबाजूला काही वस्ती असल्याचे जाणवत नव्हते. मनात थोडी भीती, धाकधूक वाढली होती. समोर रस्त्याच्या पलीकडे एका पालात बारीकसा धुकटसा दिवा जळत असल्याचे दिसले, तो लोहाराचा तंबू होता. तो काम संपवून निघण्याच्या तयारीतच होता. मी त्याला विचारले, ‘‘चाचा, मुझे अलवर जाना है, अब गाडी कहाँ मिलेगी?’’ त्याने माझ्याकडे पाहिले. म्हणाला, ‘‘अरे साहब! अब कहाँ गाडी मिलेगी, अभी तो सुबह ही गाडी मिलेगी’’ आमचा हा संवाद चालू असताना एक जुनी जीप तेथे आली. त्या लोहारानेच जीपवाल्याला मला अलवरला जायचे असल्याचे सांगितले. मी सहज खडा टाकावा म्हणून त्याला विचारले, ‘‘क्‍या आप मुझे अलवर छोडेंगे? मै आपको तीन हजार रुपये दूंगा.’’ तो माझ्याकडे न पाहताच पुटपुटला, ‘‘इतनी रात को कहां अलवर छोडेंगे?’’ मी आणखीन एक हजार वाढवले, तसे तो लोहार त्याच्याशी काहीतरी बोलला. मग काही क्षणात तो जीपवाला मला म्हणाला, ‘‘आप रुको, मै अभ्भी आता हूं।’’ त्याने त्या लोहारालाही तो येईपर्यंत वाट पाहायला सांगितले. 

वीस मिनिटानंतर तो चार उंच धिप्पाड तरुणांना घेऊन आला, दाढी वाढलेले, लाल डोळे असलेल्या त्या तरुणांच्या हातात काठ्या व एकाच्या हातात तलवार होती. आता भीतीने माझी पाचावर धारणच बसली, साऱ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मला पश्‍चात्ताप व्हायला लागला. उगाच या जीपवाल्याच्या नादाला लागलो, पण आता वेळ निघून गेली होती. जीपवाला म्हणाला, ‘‘बैठो साब आगे’’, मी पुन्हा काही बोलायच्या आत तो म्हणाला, ‘‘चलो जल्दी, हमको सुबह से पहले जल्दी वापस आना है।’’ मी देवाचे नाव घेत पुढच्या सीटवर बसलो. ते चार तरुण मागे. जीप सुरू झाली. रस्ता फारच वेड्यावाकड्या वळणाचा, डोंगराळ भागातून जाणारा सुमसाम असा होता. त्या तरुणांनी मागे बसून दारू प्यायला सुरवात केली. मी देवाचा धावा करत होतो. पुण्यापासून दूर परगावी माझे काही बरे-वाईट झाले तरी कोणाला समजणार नाही. मला माझ्या घरच्या लोकांची आठवण व चेहरे समोर यायला लागले होते. माझ्या हातातील घड्याळ, अंगठी, चैन माझ्या अंगावर तशीच होती. ब्रिफकेसमध्ये ऑफिसच्या कामाचे बरेच पैसे होते. मी ब्रिफकेस घट्ट धरून डोळे झाकून घेऊन जे होईल त्याची वाट पाहत बसलो होतो. साधारण दीड ते दोन तासांनी त्यांनी जीप थांबवली. जेवणासाठी ते खाली उतरले. मीही खाली उतरलो. सहज एकाला विचारले, ‘‘अलवर कितना दूर है?’’ त्याने दूरवर दिसत असलेल्या 

लाइट्‌स दाखवत सांगितले, ‘‘वो जो बत्तीयाँ दिख रही हैं ना, वह अलवर ही है।’’ मला एकदम हायसे वाटले व आश्‍चर्यदेखील. जीपवाल्यांनी आपल्याला काहीच कसे केले नाही. 

अर्ध्या तासात आम्ही अलवरच्या चेक नाक्‍यावर पोचलो, तेथील लोकांना आम्ही ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याचेच जास्त नवल वाटले. तो रस्ता डोंगराळ भागातून जाणारा निर्मनुष्य व फार खतरनाक होता. दिवसाही तेथे लूटमार करून खून पडत असत, त्यामुळे सहसा तेथून कोणी प्रवास करण्याचे टाळत. थोड्याच वेळात त्या जीपच्या ड्रायव्हरने चौकशी करत बहिणीच्या घराजवळ पोचवले. मला वाटेत लुटतील, असे त्या पाचांबद्दल मला वाटले होते. प्रत्यक्षात ते माझ्या सुरक्षेसाठी आले होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात कुविचार आले याचे वाईट वाटले. माझ्या डोळ्यांत नकळत अश्रू आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukatpeeth article ravindra thorat