जयहिंद

muktapeeth
muktapeeth

रात्र घनअंधारी. पावसाची रिपरिप सुरूच. अशा वेळी लहान मुलीसह एकजण दुचाकी ढकलत जाताना दिसला. त्याला मदत केल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते.

एके रात्री काहिशा उशिराच वानवडीतून जात असताना एका मधल्या रस्त्यावर एक जण आपली दुचाकी मोठ्या कष्टाने ढकलताना दिसला. त्याच्या बाजूने एक छोटी दहा-बारा वर्षांची मुलगी चालत होती. पावसाच्या टपटप आवाजाव्यतिरिक्त सर्वत्र सुनसान. त्या मुलीने डोक्‍यावरून कापड घेतले होते. मी गाडीचा वेग थोडा कमी केला. ‘‘क्‍या हुआ भाईसाब?’’ मी त्याला विचारले. तो थांबला. त्याच्या अंगावर सैनिकी वेश. त्याच्या मुलीला अचानक ताप आल्यामुळे तो संध्याकाळी तिला घेऊन वानवडीच्या लष्करी रुग्णालयात गेला होता. तिथून त्याला निघायला रात्र झाली. रस्त्यात त्याची गाडी पंक्‍चर झाली. घरी त्याची पत्नी चिंतेत असणार. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या गाडीने त्याला सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी रवाना व्हायचे होते. अशक्तपणामुळे त्याच्या मुलीला नीट चालताही येत नव्हते.

माझ्या दुचाकीच्या डिकीत सर्व पान्हे, हत्यारे होती. पंक्‍चर असलेले चाक काढले. मग तो, त्याची मुलगी आणि ते चाक घेऊन निघालो. थेट रास्ता पेठ. ज्याच्याकडे मी माझी दुचाकी दुरुस्तीला टाकतो त्याच्याकडे. गॅरेजवाला चक्क आम्हाला त्याच्या घरासमोरच भेटला. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. एका सैनिकासाठी तो लगेच तयार झाला. त्याने काम सुरू केले. तोपर्यंत मी त्या सैनिकाला आणि त्याच्या मुलीला जवळच्याच दूध डेअरीवर नेले. सर्वांनी कलाकंद खाल्ले आणि दूध प्यायलो. आता त्या आजारी मुलीच्या चेहऱ्यावर तकवा आला. गॅरेजवर आलो. चाक तयार झाले होते. गॅरेजवालाही आमच्याबरोबर निघाला. त्याची गाडी व्यवस्थित करून दिली. त्या सैनिकाने आपल्या सैनिकी पेशाला साजेल असा कडकडीत सलाम ठोकला आणि आपल्या पहाडी, कणखर, धारदार आवाजात म्हणाला, ‘जयहिंद’. त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मुलीनेही नकळत वडिलांनी केला तसाच सलाम केला. माझ्याही तोंडून तसेच शब्द आले, जयहिंद !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com