घरातलं घरटं

डॉ. विद्या मराठे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

विश्वासाने पक्ष्यांनी घरात घरटे बांधले; पण एक दिवस अचानक घरट्यातील अंडी नाहीशी झाली. ती अंडी कशी नाहीशी झाली? पाखरे पुन्हा परततील?

विश्वासाने पक्ष्यांनी घरात घरटे बांधले; पण एक दिवस अचानक घरट्यातील अंडी नाहीशी झाली. ती अंडी कशी नाहीशी झाली? पाखरे पुन्हा परततील?

गेल्या काही दिवसांपासून एका बुलबुल पक्ष्याच्या जोडीची माझ्या घरात बरीच लगबग चाललेली मी पाहत होते. त्या आधीही त्यांनी वारंवार घरात येऊन टेहळणी केलेली माझ्या लक्षात आली होती. वाटलं, घरात आणि घरालगतच्या गच्चीवर खूप झाडं असल्यामुळे ती आली असतील. पण आताची लगबग जरा वेगळी होती. घरातल्या कुंडीतल्या एका बऱ्यापैकी मोठ्या झाडावर घरटं बांधायचा त्यांचा विचार असावा. त्यांची ती काडी काडी गोळा करून घरटं बांधायची धावपळ भान हरपून बघत बसायचे! मनात आलं, माझी तिन्ही मुलं अमेरिकेत जाऊन बसली आहेत, निदान या पक्ष्यांना मला सोबत करावीशी वाटते आहे हे काय कमी आहे!

घरटं पूर्ण झाल्यावर मादी बुलबुल वारंवार त्या घरट्यावर येऊन बसू लागली. चाहूल लागली की उडून जायची. पुन्हा बसायची. पाच-सहा दिवसांनी त्यात एक लहानसं अंडं दिसलं. नंतर दोन-तीन दिवसांतच एकाची तीन अंडी झाली. या पक्ष्यांना आपण किती अंडी घातली आहेत, ते मोजता येत असेल का? आता तर ती मादी सतत घरट्यावर बसलेली असायची. घरी काम करायला माझी बाई आली की उडून जायची. एक दिवस बाईला येऊ नकोस, म्हटलं. त्या रात्री लाईट व टीव्हीसुद्धा लावला नाही. तर ती दिवसभर आणि रात्रभर घरट्यावर बसून राहिली होती. दोन दिवसांनी माझ्या घरी बरेच लोक सतत येत राहिले. त्यामुळे तिला घरात यायला मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आली घरट्यावर, पण मला तिची हालचाल जरा बिचकत झाल्यासारखी वाटली. कालच्या गोंधळामुळे ती घाबरली असावी? दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे घरट्याकडे आली नाही. म्हणून मी घरट्यात डोकावून पाहिले तर तिथली अंडी गायब. ती अंडी कुठे गेली? त्यानंतर ते पक्षीही परत कधी दिसले नाहीत. आपलं जुनं घरटं बघायला ते कधी तरी येतील म्हणून मी त्यांची सतत वाट बघत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr vidya marathe