क्षण आनंदाचा!

गौरी संतोष कुलकर्णी
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

सहज गप्पात कळले की, मैत्रिणीच्या सासूबाईंचा वाढदिवस आहे. आम्ही साऱ्या सख्यांनी त्यांच्याकडे जाऊन तो आनंदक्षण अनुभवला.

सहज गप्पात कळले की, मैत्रिणीच्या सासूबाईंचा वाढदिवस आहे. आम्ही साऱ्या सख्यांनी त्यांच्याकडे जाऊन तो आनंदक्षण अनुभवला.

खरे तर आमचे नवरे एकमेकांचे सवंगडी म्हणून आम्ही बायकाही एकमेकींच्या सख्या झालो. आम्हा सगळ्या मैत्रिणींचे एक नाते झाले.... मैत्रीच्या पलीकडले नाते. या नात्यामुळे आम्ही सगळ्या खूप घट्ट बांधल्या गेलो... वीस वर्षे झाली या मैत्रीला... नुकताच एक आनंदाचा क्षण समोर आला. एका मैत्रिणीच्या सासुबाईंचा वाढदिवस होता. तर, त्या मैत्रिणीची आणि आमची कट्ट्यावर भेट झाली. तिने सांगितले की सासूबाईंचा वाढदिवस आहे. कट्ट्यावरच ठरले आणि आम्ही घरची सगळी कामे आवरून केक घेऊन मैत्रिणीच्या दारात. काकूना नमस्कार केला. औक्षण केले. केक कापला आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. वय, संसार आणि असे बरेच काही.... त्या बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नव्हती. काकूंच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दातसुद्धा मोजता येणार नाही असा होता. चेहऱ्यावर एक विलक्षण तेज झळकत होते. अनपेक्षितपणे त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. सुना-नातवंडांसह त्या हा आनंदक्षण साजरा करत होत्या. मला माझ्या सासूबाईंची आठवण येऊन नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या...

आमच्यातील एकीने त्यांचे आवडते गाणे गायले. गाणे संपले आणि आम्ही काकूंचा निरोप घेत होतो. अन् निघताना काकू त्यांचे आनंदाश्रू थांबवू शकल्या नाहीत. आणि त्यांचा अश्रूंचा बांध फुटला. आनंद ने त्या इतक्या रडायला लागल्या आणि आम्ही पण त्यांना जवळ घेऊन त्याच्या रडण्यात सामील झालो... त्यांनी एका वाक्यात आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला. ‘‘आहे तशातच आनंदी राहा गं पोरींनो’’ या वाक्यात सर्व काही आले. खरेच आज एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. सासू-सुना एकमेकांना जवळून ओळखू शकतात आणि एकमेकींचाच खरा आधारा होऊ शकतात.

असे छोटे छोटे क्षण आपल्याही आयुष्यात खूप काही आनंद आणि ऐश्‍वर्य देऊन जातात... फक्त आपल्याला ते वेचता आले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by gauri kulkarni