चंद्रखणी

प्रीतिश मोहिते
Saturday, 21 December 2019

हिमालयात भटकंतीचे वेड वेगळेच. या हिमालयीन रांगांमधील चंद्रखणी गाठली आणि धन्य झालो.

हिमालयात भटकंतीचे वेड वेगळेच. या हिमालयीन रांगांमधील चंद्रखणी गाठली आणि धन्य झालो.

चंद्रखणी पासला जाण्याचे ठरविले. मनालीला पोहोचलो. पुढे दहा किलोमीटरचा प्रवास बाकी होता. ट्रेक नग्गर येथून सुरू होणार होता. नग्गर हे मनालीजवळचे छोटेसे गाव. गावात भ्रमंती केली. दुसऱ्या दिवशी हिमालयातील ट्रेकसाठी आवश्यक सराव केला. ट्रेक सुरू झाला. सकाळी लवकर उठून न्याहारी केली व सोबत ‘पॅक्ड लंच’ घेऊन पुढच्या प्रवासाला सुरवात झाली. नग्गर ते स्टर्लिंग हा रस्ता एका गावातून जातो. इथे घरे जमिनीपासून उंचावर बांधलेली दिसतात. दोन मजली असलेली ही सर्व घरे उतरत्या छपरांची. येथे होणारी बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस यापासून संरक्षणासाठी या घरांची रचना अशी केलेली असते. मुख्य म्हणजे इथे शिकणारी मुले डोंगर उतरून खाली येतात आणि शाळा-महाविद्यालयात जातात. पुढचा टप्पा चखलानीला असल्यामुळे कॅम्प लवकर सोडला. आजचा प्रवास कालच्यापेक्षा थोडा अवघड होता आणि दोन दिवस वरती भरपूर पाऊस झाल्यामुळे रस्ता खूपच निसरडा झाला होता. चालताना खूपच त्रास झाला. अधूनमधून पाऊस लपंडाव खेळत होता. पाइन वृक्षांनी बचावासाठी डोक्यावर आधार धरला होता. मजल दरमजल करत पावसाबरोबर खेळत चखलानीला पोहोचलो. काही वेळापासून लंपडाव खेळणाऱ्या पावसाने चखलानीत जोरदार स्वागत केले.

ट्रेक सुरू झाल्याचा आज तिसरा दिवस. आज आम्हाला चंद्रखणीला जायचे होते. तंबूबाहेर येऊन पाहतो तर काय मस्त ऊन पडले होते. नेहमीचे कार्यक्रम आटोपून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. काल झालेल्या पावसामुळे आणि वर झालेल्या बर्फवृष्टीमुळे आजच्या मार्गावर सर्वत्र बर्फ पडलेला. जणू काही बर्फाने आमच्या स्वागतासाठी शुभ्र पायघड्या घातल्या होत्या. त्या पायघड्यांवरून सावध चालत, कपाळमोक्ष होऊ न देता आम्ही मोहीम पार पाडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by pritish mohite