आभार खड्ड्यांचे

समीक्षा खटावकर
Friday, 17 January 2020

पीएमटीला आणि खड्ड्यांना शिव्या घालणारे बरेच आहेत, पण कुणाला फायदाही झालेला असू शकतो.

पीएमटीला आणि खड्ड्यांना शिव्या घालणारे बरेच आहेत, पण कुणाला फायदाही झालेला असू शकतो.

आपण सर्वच पुणेकर पीएमटी आणि रस्त्यांवरच्या खड्ड्यांना नाव ठेवतो. पण मला मात्र या खड्ड्यांचे आणि पीएमटीचे आभार मानायचे आहेत. तुम्ही म्हणाल, या बाईचे डोके ठिकाणावर आहे ना? पण कारण सांगितले की तुम्हालाही पटेल. माझ्या मोठ्या दिराना रोज वारजे ते फुरसुंगी असा स्कूटरने प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी जावे लागत असे. त्या सगळ्याचा त्रास म्हणून असेल, पण त्यांना ‘फ्रोजन शोल्डर’चा त्रास सुरू झाला. तरी वेळेवर पोचायचे म्हणून ते त्यांच्या स्कूटरनेच कार्यालयात जात. पण एकदा स्कूटरने त्यांना रस्त्यातच दगा दिला, काही केल्या सुरूच होईना. जवळपास गॅरेजही नव्हते. तेवढ्यात फुरसुंगीला जाणारी बस आली. त्यांनी स्कूटर त्या ठिकाणी ‘पार्क’ केली आणि गच्च गर्दीने भरलेल्या पीएमटीमध्ये प्रवेश केला. डाव्या खांद्याला बॅग लटकावून, दुखणाऱ्या उजव्या हाताने त्यांनी गाडीचे वरचे हॅंडल धरण्याचा प्रयत्न केला. पण जमेना.

त् यादिवशी रस्त्यावर खूपच गर्दी होती. त्यातून कशीतरी वाट काढत गाडी चालली होती. जागोजागी खड्डे असल्यामुळे एकदा डावीकडे, तर एकदा उजवीकडे असे हेलकावे घेत बस चालली होती. तोच ड्रायव्हरने अचानकपणे करकचून ब्रेक दाबला, त्यामुळे बसमधील उभी असलेली माणसे बेसावधपणे पुढे आदळली. माझे दीरही बेसावधपणे अचानक पुढे ढकलले गेले. ते उजव्या हाताने आधार पकडू गेले आणि त्यांच्या उजव्या हाताला एक क्षणभर मरणप्राय वेदना झाल्या. क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांना खूप आनंद झाला, कारण या घटनेमुळे, त्यांच्या हाताचा जो सांधा, स्नायू आखडला गेला होता, तो मोकळा झाला. तिथे होणाऱ्या वेदनाही थांबल्या होत्या आणि सामान्य माणसाप्रमाणे ते आपल्या उजव्या हाताची हालचाल करू लागले. ‘फ्रोजन शोल्डर’पासून मुक्तता मिळविण्यासाठी त्यांनी अनेक डॉक्‍टर, वैद्य, दवाखाने पालथे घातले होते. कशाचाही त्यांना उपयोग झाला नव्हता, पण याच गर्दीने गच्च भरलेल्या पीएमटी बसमुळेच त्यांना या दुखण्यापासून मुक्तता मिळाली. मग सांगा, पीएमटीचे आणि खड्ड्यांचे आभार मानू ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by samiksha khatawkar