रिक्षावाला

स्नेहल जोशी
Thursday, 19 December 2019

बहुतेक रिक्षावाले चांगलेच असतात. पण एखादा-दुसरा लबाडी करू पाहतो आणि समस्त रिक्षावाल्यांविषयी मन कलुषित होते.

बहुतेक रिक्षावाले चांगलेच असतात. पण एखादा-दुसरा लबाडी करू पाहतो आणि समस्त रिक्षावाल्यांविषयी मन कलुषित होते.

त्या दिवशी जवळ जवळ दोन वर्षांनी मी डेक्कन जिमखान्यावर गेले. रिक्षाने जायचे-यायचे म्हणून मी तयार झाले. आजारानंतर बऱ्याच दिवसांनी बाहेर पडले होते. मेट्रो प्रकल्पाचे सुरू असलेले काम, त्यात वाहनांची गर्दी... रिक्षातच बराच वेळ गेला. नेहमीच्या दुकानात गेलो. खरेदीनंतर दोन हजारांची नोट दुकानदाराला दिली. त्याने दिलेले उर्वरित पैसे यांनी शर्टाच्या खिशात टाकले. शर्ट जाळीदार कापडाचा. त्यातून हिरव्या नोटा दिसत होत्या. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. रिक्षावाल्याने नळस्टॉपकडे गर्दी असेल म्हणून रिक्षा आतल्या रस्त्याने घेतली. गर्दी नसलेल्या जागी त्याने रिक्षा थांबविली आणि तो यांना म्हणाला, ‘माझा मोबाईल मागे राहिला आहे, तो घेतो.’ असे म्हणत तो यांच्या अंगावरून वाकला. यांनी खिशावर हात ठेवला होता. तो खिशाला स्पर्श करतोय हे यांना जाणवलेच, पण बाजूला बसलेल्या मला ते स्पष्ट दिसले. ‘‘ए, खिशाला का हात लावतोस?’’ मी ओरडलेच. त्याने मागच्या बाजूने रुमाला काढत तो झाडला आणि आपण काही घेतले नसल्याचे दाखवले. यांनी मला खूण केली आणि मी गप्प बसले.

रिक्षात बसल्यापासून यांच्या खिशातल्या नोटा कशा पळवायच्या हा बहुदा त्याचा विचार चालला होता. घरी परत आलो. रिक्षाचे भाडे देताना एक रुपया कमी होता. त्या वेळी उदारता दाखवत म्हणाला, ‘‘चालतं साहेब, राहू द्या!’’ खिशातल्या नोटा चोरण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस आणि त्याचे आताचे हे बोलणे... दुसऱ्या एका रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले. काही सुटे पैसे पाहताना लक्ष इकडेतिकडे गेले. तर शंभराऐवजी दहाची नोट समोर धरीत उर्वरित पैसे रिक्षावाला मागू लागला. ते नुकसान सोसावे लागले. मला कल्पना आहे, की सर्वच रिक्षावाले असे नसतात. चांगलेच अधिक असतात, पण या दोन अनुभवांनी आता कधीही रिक्षाने जाताना मी मनाला बजावते... ‘सावधान! पुढे रिक्षावाला आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by snehal joshi