कष्टाचं चीज

नरेंद्र भाटिया
गुरुवार, 30 मे 2019

आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मधुरा कित्येक वर्षांनी एका बॅंकेत काम करत असताना आम्हाला भेटली. आमची मुलगीच होती ती.

आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मधुरा कित्येक वर्षांनी एका बॅंकेत काम करत असताना आम्हाला भेटली. आमची मुलगीच होती ती.

1963 मध्ये माझी बदली बारामती येथे झाली. पुण्यामध्ये त्या वेळी स्वतःचे घर नसल्याने मी कुटुंबासह बारामती येथे शिफ्ट झालो. तिथेच होतो, मी, पत्नी व आमची एक वर्षाची मुलगी. मुलगी लहान असल्याने काही दिवस घरकामासाठी मदत म्हणून पत्नी, कामवाली बाई शोधू लागली व एके दिवशी मधुराच्या आईची भेट झाली. मधुराच्या आईची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. घरी खाणारी तोंडे जास्त, नवरा व्यसनी, घर झोपडपट्टीत अशा परिस्थितीत ती मजुरी करीत होती. मजुरीला जाताना सोबत मधुरालाही घेऊन जात होती.

माझ्या पत्नीने तिला मधुरा शाळेत जाते का विचारले, त्यावर ती कधी कधी जाते म्हणून सांगू लागली. माझ्या पत्नीने मधुराच्या आईला शिक्षणाचे महत्त्व सांगितले व काही मदत लागल्यास मी खर्च करेन व अभ्यासही घेईन, असे सांगितले. तिनेही आनंदाने मधुराला पाठविले.

दुसऱ्या दिवसापासून मधुरा घरी येऊ लागली. मधुरा नावाप्रमाणेच गोड होती. आम्ही दोघेही तिला स्वतःच्या मुलीसारखेच समजत होतो. ती अभ्यासही करत असे व पत्नीलाही घरकामात मदत करत असे. मी बारामतीला सहा वर्षे होतो. आमच्यासमोर मधुराने दहावीची परीक्षा दिली. परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर माझी बदली पुण्यास झाली. नंतर रोजच्या कामामुळे बारामतीला जाता आले नाही, त्यामुळे मधुराची काहीच खबर कळली नाही.

नंतर एके दिवशी मधुराचा फोन आला. ती पुण्यात एका बॅंकेत काम करत होती. आम्ही दोघे तिला भेटायला गेलो. तिला भेटून पत्नीला फार आनंद झाला. मधुराला घरचे विचारले असताना तिने नवरा निर्व्यसनी आहे व तिची मुलं इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, असे सांगितले. मध्यंतरी माझ्या मुलीचे लग्न झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी मधुरा तिच्या पतीसह भेटावयास आली. दोघांनी आम्हाला वाकून नमस्कार केला व गिफ्टही दिले. पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. मधुराच्या कष्टाचं चीज झालं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by narendra bhatiya